कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राणी संग्रहालये व वन्यप्राणी बचाव केंद्रांनी अधिक दक्षता घेण्याच्या वनमंत्र्यांची सूचना

346

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर,राज्यातील प्राणी संग्रहालयामध्ये व वन्य प्राणी बचाव केंद्रामध्ये अधिक दक्षता घेण्यात यावी व केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

राज्यात विविध जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अखत्यारित येत असलेल्या प्राणीसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्राशी तातडीने संपर्क साधून त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे.आवश्यकतेनुसार विलगीकरण करावे.कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी. प्राणीसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्रातील प्राण्यांना संसर्ग आहे किंवा कसे याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून नमुना तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत किमान आवश्यक मनुष्यबळ वगळता प्राणिसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्राच्या आत मानवी वावर वाढवू नये असे स्पष्ट निर्देशही वनमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्यात मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व प्राणी संग्रहालय, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, पुण्यातील कात्रजमधीलराजीव गांधी वन्यप्राणीसंग्रहालय व संशोधन केंद्र, चिंचवडमधील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय, औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय,सोलापुरातील महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान व प्राणी संग्रहालय,नागपूरमधील महाराजबाग प्राणीसंग्रहालय, कोल्हापुरातील महाराजा शहाजी छत्रपती प्राणीसंग्रहालय,ढोलगरवाडीतील शेतकरी शिक्षण मंडळ सर्पोद्यान,नागपूरमधील गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्र, माणिकडोह जुन्नरमधील बिबट बचाव केंद्र,वर्ध्यातील पीपल फॉर ॲनिमल शेल्टर हाऊस आणि हेमलकसा (जि. गडचिरोली) येथील आमटेज् ॲनिमल पार्क, वन्यप्राणी बचाव केंद्र अशी एकूण 13 प्राणीसंग्रहालय व वन्य प्राणी बचाव केंद्रे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या