पाटोद्यातील शाळा पुन्हा सुरू झाल्या, पाचवी ते आठवीचे वर्ग विद्यार्थ्यांनी गजबजले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या पाटोदा तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बुधवारी पुन्हा सुरू झाल्या.  तब्बल 10 महिन्यानंतर इथल्या शाळा सुरू झाल्या असून आज तालुक्यातील शाळांची घंटा पुन्हा खणखणली.  शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासण्यात येत आहे. पाटोदा तालुक्यातील मराठी,उर्दू माध्यमांच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या असून इथे  पाचवी ते आठवी या चार वर्गामध्ये मिळून  16878 विद्यार्थी आहेत. पालकांनी पाठवायची संमती दिली तरच विद्यार्थांना शाळेत प्रवेश दिला जाईल असं आधीच स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर 20 मार्च पासून सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली होती. 23 नोव्हेंबर पासून तालुक्यातील 9 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला होता, मात्र हळूहळू संख्या वाढायला लागली आहे.  कोरोनाची पाटोदा तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर इथे  बुधवारपासून 5वी ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती.  कोरोना काळात तालुक्यातील काही शाळांच्या खोल्या संशयित रुग्णांना क्वारंनटाईन कक्षासाठी दिल्या होत्या.  या सगळ्या खोल्या जंतुनाशकांची फवारणी करून निर्जंतुक करण्यात आल्या होत्या असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या