पालिकेचे कॉल सेंटर देतेय लोकांना धीर, 50 डॉक्टरांची टीम करतेय मोफत मार्गदर्शन

561

कोरोना व्हायरसबद्दल असलेल्या शंका-कुशंका दूर करून हजारो मुंबईकरांना योग्य ते मार्गदर्शन आणि धीर देण्याचे काम 50 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असलेले मुंबई महानगरपालिकेचे कॉल सेंटर करत आहे. आतापर्यंत या कॉल सेन्टरला 6 हजारपेक्षा जास्त व्यक्तींनी संपर्क केला असून यातील 319 जणांना कोरोना चाचणी करण्याचा आणि 1 हजारपेक्षा जास्त लोकांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईत कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने 50 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असलेले कॉल सेन्टर स्थापन करून मुंबईकरांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवत असतील त्यांना दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळत आहे. ‘022-470-85-0-85’ यावर दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 7 या कालावधीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिकांना मिळत आहे. कोरोनाचे रुग्ण मुंबईत सापडू लागल्यानंतर हे कॉल सेंटर सुरू करण्यात आले. अशा प्रकारचे देशातील हे पहिलेच कॉल सेंटर असून गेल्या सुमारे दहा दिवसात तब्बल 6 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी दूरध्वनी करून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आहे. तर यापैकी 319 व्यक्तींना ‘करोना कोविड 19’ विषयक वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे करताना संबंधितांना त्यांच्या घरी येऊन नमुने घेऊन जाणाऱ्या प्रयोगशाळांचे ‘दूरध्वनी क्रमांक’ हे ‘कॉल सेंटर’ द्वारे देण्यात येत आहे. जेणेकरून संशयितांना त्यांची वैद्यकीय चाचणी करवून घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही.

‘कॉल सेंटर’ द्वारे नियमित पाठपुरावा

फोन करणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करणे गरजेचे आहे, असे तज्ञ डॉक्टरांना आढळून आल्यास त्या व्यक्तीला त्याच्या परिसरातील खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून ‘करोना कोविड 19’ ची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने कॉल करणाऱ्या सर्व नागरिकांची लक्षणे, दूरध्वनी क्रमांक, राहत असलेला परिसर इत्यादी बाबींची सुव्यवस्थित नोंद कॉल सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. यामुळे या ‘कॉल सेंटर’ला ज्यांनी फोन केले आहेत, त्यांना ‘कॉल सेंटर’ द्वारे ‘फोन’ करण्यात येत असून त्याद्वारे आवश्यक तो पाठपुरावादेखील नियमितपणे करण्यात येत आहे. त्याचबरोबर घरच्या घरी विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींबाबतदेखील ‘कॉल सेंटर’ द्वारे पाठपुरावा करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या