संशयित कोरोनाग्रस्त पोलिसावर थुंकला, 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

1739

लंडनमधल्या एका संशयित कोरोनाग्रस्ताला तिथल्या स्थानिक न्यायालयाने 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पीटर डेव्ही असं या आरोपीचं नाव आहे. पीटर हा निवृत्त कर्मचारी असून त्याच्यावर आरोप होता की त्याने एका पोलिसाला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर थुंकला. पीटरचं वय 65 असून तो ब्रायटन भागातील रहिवासी आहे.

डॉक्टरांवर थुंकले, गैरवर्तन केले; मरकजमधून सोडवलेल्यांना इतरत्र हलवण्याची विनंती

 

पीटरने शनिवारी गुन्हा केला होता ज्याबद्दल त्याला बुधवारी शिक्षा सुनावण्यात आली. गेल्या शनिवारी पीटर हा त्याच्या शेजारच्यांना शिवीगाळ करत होता, तुम्ही समलिंगी आहात असा आरडाओरडा करत तो शेजारच्यांवर थुंकायला लागला होता. जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा त्याने त्यांनाही धमकी दिली की इतून निघून जा नाहीतर मी तुमच्यावरही थुंकेन. त्याने खरोखर थुंकायला सुरुवात केली आणि त्याच्या थुंकीचे शिंतोडे एका पोलीस हवालदाराच्या अंगावर उडाले. यानंतर पीटर घरात पळून गेला आणि त्याने दार लावून घेतलं. मात्र त्याचा घरातूनच आरडाओरडा सुरुच होता. ‘मी शेजारच्यांना समलिंगी म्हणालो म्हणून तुम्ही इथे आला आहात’ असं तो सातत्याने ओरडत होता.

विकृतीचा कळस, कोरोनाविरोधातील लढ्यात झोकून दिलेल्या नर्सच्या अंगावर रहिवासी थुंकले

 

ब्रायटन विभागाचे पोलीस अधीक्षक निक मे यांनी हा प्रकार अत्यंत किळसवाणा होता असं म्हटलंय. आमचे पोलीस हे लोकांचा जीव वाचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात, जर त्यांच्यासोबत कोणी असं वागणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी पीटरला अटक केली आणि न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभं केलं. यावेळी पीटरने आपला गुन्हा कबूल केला. पीटरची तब्येत चांगली नसूनही त्याने केलेलं कृत्य पाहून न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

न्यायाधीश अमांडा केली यांनी पीटरला शिक्षा सुनावताना म्हटले की देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. कोरोना आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लोकांवर थुंकणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे कृत्य आहे. पीटरच्या वकिलांनी त्याच्यावतीने बचाव करताना म्हटले की लॉकडाऊनमुळे पीटर अस्वस्थ झाला होता आणि यातूनच त्याने हे कृत्य केले. पीटरला त्याच्या कृतीबद्दल पश्चाताप होत असल्याचेही त्याचे वकील जो हॅरींग्टन यांनी म्हटले होते. लॉकडाऊनमुळे पीटरला एकटेपणा अधिकच खायला लागला होता, ज्यामुळे तो जास्त दारू प्यायला लागला होता. असंही त्याच्या वकिलांनी म्हटलं होतं. मात्र पीटरची मानसिक अवस्था ठीक नाहीये, त्याला कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत त्याने पोलिसांवर थुंकणे हे अजिबात स्वीकारार्ह नाही असं न्यायाधीश केली यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या