हिंदुस्थान कोरोनामुक्त, केरळमधील तीनही रुग्ण ठणठणीत

401
corona-virus-new-keral

चीनसह जगभरात कोरोना व्हायरसने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. असे असताना हिंदुस्थानमधील डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेत कोरोनाची लागण झालेल्या तीनही रुग्णांना पूर्ण बरे करण्यात यश मिळवले आहे. केरळमधील तीनही रुग्णांवर गेल्या आठवड्यापासून उपचार सुरू होते. त्यानंतर तिघांना स्वतंत्र कक्षात ठेवून त्यांच्यावर 24 तास लक्ष ठेवले जात होते. एक एक करून तिघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर आधी दोन रुग्णांना आणि आज तिसऱ्या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

आधी सोडण्यात आलेल्या दोन रुग्णांवर कसारगोड येथील कंझनगढ सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होता. तर दुसऱ्या एका विद्यार्थ्यावर अलप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होता. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे.

चीनमध्ये आतापर्यंत 1775 मृत्यू

चीनमध्ये कोरोना व्हायरस (कोविड-19) मुळे रविवारी आणखी 142 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 1775 इतका झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोग (एनएचसी)च्या माहितीनुसार, शनिवारपासून 2,009 नवीन रुग्ण दाखल झाले आहेत, मात्र दिलासादायक वृत्त म्हणजे नवीन रुग्णांच्या संख्येतील वाढ घटली आहे. याआधी दिवसाला 2,641 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह येत होता. आता पर्यंत एकूण 71330 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 10973 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी हिंदुस्थान उपकरणांच्या रुपाने मदद पाठवणार

चीनमध्ये कोरोना व्हायरसचे मोठे संकंट अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठीची उपकरणे कमी पडत आहेत. हिंदुस्थानने आपला शेजारी चीनच्या मदतीला धावून जाण्याचे निश्तित केले असून हिंदुस्थानचे राजदूत विक्रम मिस्री यांनी रविवारी ट्विटर लिहिले आहे की, ‘तपासणी आणि उपचारासाठीची उपकरण हिंदुस्थानातून चीनमध्ये पाठवण्यात येत असून चीनला या कठीण समयी मदत करण्यात येईल. चीनी नागरिकांसोबत हिंदुस्थानी नागरिकांचे ऐक्य, मैत्री आणि सद्भाव याचे दर्शन या मदतीतून होणार आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या