नवे रुग्ण घेण्यास मनाई केल्याने डॉक्टरचे अपहरण

1751

कोरोना व्हायरसच्या ( corona virus ) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांवर ताण यायला लागला आहे. याही परिस्थितीमध्ये डॉक्टर या रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. रुग्णालयात नव्या रुग्णांसाठी जागा नसल्याने एका रुग्णालयाने नव्या रुग्णांच्या भरतीसाठी नकार दिला. याचा राग आल्याने गुंडांनी हे रुग्णालय चालवणाऱ्या प्रख्यात शल्यचिकीत्सकाचेच अपहरण केलं आहे.

जेरी बिटार असं या शल्यचिकीत्सकाचे नाव असून ते आपल्या जुळ्या भावासह हैतीमध्ये बर्नार्ड मेव्स रुग्णालय चालवतात. हैतीमधल्या नावाजलेल्या रुग्णालयांपैकी बिटार यांचं रुग्णालय आहे. गेल्या काही महिन्यात हैतीमध्ये अपहरणाची प्रकरणे वाढीला लागलेली आहे. हैती हा अत्यंत गरीब देश असून तिथे आर्थिक आणि राजकीय संघर्ष पेटलेला आहे. यातूनच अपहरणांची संख्या वाढायला लागली आहे. शाळकरी विद्यार्थी, राजकारणी, उद्योजक यांचे आतापर्यंत अपहरण केले जात होते, मात्र आता डॉक्टरांचेही अपहरण व्हायला सुरुवात झाली आहे. कोरोनासारख्या आजाराचा उद्रेक झालेला असताना डॉक्टरचे अपहरण होणं ही आश्चर्याची बाब असल्याचं जीन चार्लस नावाच्या तिथल्या स्थानिकाने म्हटलं आहे. जीनच्या मित्राचा बिटार यांच्या रुग्णालयात इलाज करण्यात आला होता. बिटार यांचे सहकारी क्लॉड डेव्हील यांनी सांगितलं की रुग्णालयावर आधीच ताण आहे. सध्या जे रुग्ण आहेत ते पूर्णपणे बरे झाल्याशिवाय नव्या रुग्णांना घेणं योग्य नाहीये. बिटार हे शल्यचिकीत्सक आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची रांग वाढत चालली होती. जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत आम्ही शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊ शकत नव्हतो असं डेव्हील यांनी सांगितलं.

हैतीमध्ये संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे. एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे गुंडांच्या टोळ्यांचा उच्छाद यामध्ये सामान्य जनता भरडली जात आहे. बिटार यांचं अपहरण कोणी केलं आणि का ? हे अजून कळू शकलेलं नाहीये. हैतीमध्ये सगळी अपहरणे ही खंडणीसाठीच करण्यात येतात. मात्र अजूनपर्यंत अपहरणकर्त्यांनी खंडणीची मागणी केलेली नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या