ज्या औषधासाठी हिंदुस्थानला धमकी दिली ते कोरोनासाठी उपायकारक नाही, अमेरिकेतील संशोधकांचा दावा

2659

हिंदुस्थानला अमेरिकेने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या पुरवठ्यासाठी धमकी दिली होती. हिंदुस्थानने मानवतेच्या दृष्टीकोनातून फक्त अमेरिकाच नाही तर इतर अनेक देशांनाही या औषधाचा पुरवठा केला. मलेरियावर रामबाण उपाय असलेलं हे औषध अत्यवस्थ असलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी फायदेशीर नाही असं अमेरिकेतीलच संशोधकांनी सांगितलं आहे. न्यूयॉर्क शहराचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या संशोधनाबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की या औषधाबाबत मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये हे औषध कोरोनाची लागण झालेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी उपायकारक नाही असे दिसून आल्याचे म्हटले आहे.

कुओमो यांनी सांगितले की अमेरिकेतील 22 रुग्णालयांमध्ये असलेल्या 600 रुग्णांवर या औषधाचा वापर करून पाहण्यात आला. या रुग्णांना औषध दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये काय बदल होतो ते तपासण्यात आले. तपासाअंती या औषधाचा रुग्णांवर होणारा परिणाम फार चांगला नसल्याचे दिसून आले. हे औषध देण्यात आलेल्या रुग्णांपैकी अनेकजण कोरोनाशी सुरू असलेला लढा हरले आणि त्यांचा मृत्यू झाला. हे औषध कोरोनामुळे अत्यवस्थ असलेल्यांसाठी उपायकारक ठरू शकत नाही असं संशोधनानंतर जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालातून दिसून आलं आहे.

कुओमो यांच्या विधानापूर्वी या औषधाबाबत आणखी एक संशोधन करण्यात आलं होतं. या संशोधनामध्ये दिसून आलं होतं की औषध घेणाऱ्या रुग्णांपैकी 28 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर मार्गांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार केल्यास ते बरे होण्याची शक्यता अधिक दिसून आली असून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर केल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. इतर मार्गांनी करण्यात आलेल्या इलाजांमुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण हे 11 टक्के इतकं आहे. हेच प्रमाण हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनबाबत 28 टक्के इतकं आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने काही दिवसांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमध्ये म्हटलं होतं की जगभरात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा उपयोग करून रुग्णांवर इलाज करण्याची अनुमती मिळाली तर त्याचा फायदा हे औषध बनवणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. हे औषध बनवणाऱ्या एका मोठ्या कंपनीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हिंस्सा आहे. या कंपनीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ट्रम्प यांचे घट्ट संबंध देखील आहे.

आपली प्रतिक्रिया द्या