Corona Virus मला गुढी पाडव्याला घरचं जेवण जेवायचंय!

21198

पुण्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. कोरोनाची लागण झालेले हे पुण्यातील पहिले रुग्ण होते. यामध्ये नवरा, बायको आणि त्यांच्या 3 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. गुढी पाडव्याला म्हणजेच बुधवारी हे कुटंब त्यांच्या घरी जाऊ शकेल अशी शक्यता आहे. या कुटुंबातील महिलेने आपल्याला गुढी पाडव्याला घरचं जेवण जेवायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. या कुटुंबाला वाळीत टाकू नये, विचित्र वागणूक देऊ नये अशी सूचनावजा विनंती ते राहात असलेल्या सोसायटीमधील सगळ्या रहिवाशांना करण्यात आली आहे.

बाधित कुटुंबातील महिलेने एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं की गेले 4-5 दिवस त्यांची औषधे बंद करण्यात आली आहे. ते पूर्ण बरे झाले असल्याची एक चाचणी बाकी असून ते पूर्ण बरे झाले असल्याचा अहवाल येणं बाकी आहे. यातील महिलेने म्हटलं की “मला आता घरी बनवलेलं जेवणं जेवायचंय. मला घरी स्वयंपाक बनवायचाय आणि यासाठी गुढी पाडव्याव्यतिरिक्त अजून दुसरा कोणता चांगला दिवस असू शकतो” सोमवारी सकाळी या कुटुंबाचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. या चाचणीचे नमुने सकारात्मक असतील आणि आम्ही कोरोनातून बरे झाले असल्याचा अहवाल आम्हाला मिळेल अशी खात्री या महिलेने व्यक्त केली आहे.

मंगळवारी या कुटुंबाचे दुसरे स्वॅब नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या तपासणीनंतर जर या कुटुंबातील सगळे सदस्य कोरोनातून बाहेर पडल्याचे दिसून आले तर त्यांना नियमाप्रमाणे रुग्णालयातून घरी जाण्याची परवागी देण्यात येईल असं नायडू रुग्णालयाचे संजीव वावरे यांनी सांगितले. घरी परतल्यानंतर हे कुटुंब पूर्णपणे बरं झालेलं असून त्यांना वेगळी वागणूक देण्यात येऊ नये अशा सूचना सोसायटीतील सगळ्यांना करण्यात आली आहे. या कुटुंबामुळे आपल्याला आजाराचे संक्रमण होईल अशी कोणतीही भीती सदस्याने बाळगू नये असे या सोसायटीच्या पदाधिकाऱ्याने सगळ्यांना मेसेजद्वारे कळवले आहे. हे कुटुंब राहात असलेल्या घराच्या चाव्या आमच्याकडे असून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांचे घर सॅनिटाईज करण्यात येणार असल्याचेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या