कोरोना व्हायरसचा परिणाम, शेतकऱ्यांचे टोमॅटो विक्रीवाचून बांधावर!

932

दैनंदिन उदरनिर्वाहाचा गाडा हाकणेसाठी, मुला-बाळांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी, शेतीखर्च, बँका,व सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील अल्प भुधारक शेतकऱ्यांनी नगदी पैशाचे पिक म्हणून भाजी पाल्याची लागवड केली. परंतू हा भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणण्याची आणि कोरोना व्हायरसचे संक्रमण कालावधी, व त्यातून शासनाने घेतलेला लाँकडाऊनचा निर्णय यामुळे विक्रीस तयार असलेले टोमॅटो गुरां-ढोरांना खाऊ घालून उर्वरीत टोमॅटो बांधावर टाकण्याची वेळ शेतकरी राजावर आली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, हाता-तोंडाशी आलेला घास कोरोना व्हायरसने हिरावल्याचे टोमॅटो उत्पादक शेतकरी कैफियत मांडत आहेत.

यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला. ऑक्टोबर-नोव्हेंबर मधील परतीच्या पावसाने लहान-मोठे तलाव तुडुंब भरले. उपलब्ध पाण्याच्या भरवष्यावर शेतकऱ्यांनी नगदी पैशाचे पिक म्हणून भाजी-पाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. अहमदपूर-हिप्पळगाव-हडोळती रोडवरील केदारप्पा हेंगणे, बाबु वलिमियाँ, हमीद पठाण, दत्ता हेंगणे, गोरोबी शिंदगीवाले आदी शेतकऱ्यांचा 14 एकर टोमॅटोंचा फड तोडणीस आलेला असून, शासनाने जाहीर केलेल्या संचार बंदीमुळे वरील शेतकऱ्यांसह तालुक्यातील अनेकांच्या टोमॅटोची विक्री होत नसल्यामुळे घरच्या गुरांना खाऊ घालून, उर्वरित टोमॅटो बांधावर टाकण्यात येत असल्याचे वरील शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलतांना सांगितले.

मागील चार-पाच वर्षापासून तालुक्यातील शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडत आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाला. आता तरी मुलां-बाळांचे शिक्षण, बँकाची व सावकाराची देणी फेडता येईल. या आशेने, नगदी पैशाचे पिक म्हणून टमाट्याची लागवड केली. पिकंही जोमात आली. फळ धारणा (लागवड) चांगली आहे. पण नेमके टोमॅटोचे फड तोडणीस येण्यास आणि कोरोना व्हायरस (संक्रमण) वाढण्याची वेळ एकच आल्याने हाता-तोंडाशी आलेला घास खरीपासारखा हिरावून जातो की काय? या भितीने तालुक्यातील भाजी-पाला, टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या