#coronavirus प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे

कोरोनाचा फैलाव सुरू होऊन दीड वर्षाचा काळ लोटला आहे. जागतिक स्तरावर उग्र रूप धारण केलेल्या या कोरोनाबाबत नागरिकांना अनेक प्रश्न पडतात. कोरोनाचा प्रसार कसा होतो, कोरोना होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी अशा अनेक प्रश्नांची सरळसोपी उत्तरे.

मच्छर चावल्याने कोरोनाचा संसर्ग होतो का?

– मच्छर चावल्याने कोरोनाचा प्रसार होतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोनाचा संसर्ग प्रथम श्वसननलिका आणि फुप्फुसात होतो. त्यामुळे शिंकल्याने किंवा खोकल्याने ते विषाणू बाहेर पडून इतरांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे सर्दी झालेल्या किंवा खोकणाऱया व्यक्तीपासून दूर राहावे.

हॅण्ड ड्रायरने कोरोना मरतो?

– हॅण्ड ड्रायरने कोरोना विषाणू मारला जातो असे म्हणणे साफ चुकीचे आहे. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी साबणाने हात साफ धुतल्यानंतर ते सुकविण्यासाठी टॉवेल किंवा हॅण्ड ड्रायरचा वापर केला जाऊ शकतो.

थर्मल स्कॅनरने कोरोना संक्रमित व्यक्ती शोधता येते का?

– कोरोना झालेल्या व्यक्तीला ताप असेल तरच त्याला थर्मल स्कॅनरने शोधता येते. पण कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णाला ताप येत नाही किंवा अनेकांना संसर्ग झालेला असला तरी ताप नसतो. त्यामुळे अशा व्यक्तींना थर्मल स्कॅनरने शोधणे कठीण आहे.

शरीरावर अल्कोहोल किंवा क्लोरिन लावल्याने कोरोना विषाणू मरेल का?

– तुम्ही कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला असाल तर तुमच्या शरीरावर असलेले कोरोना विषाणू अल्कोहोल किंवा क्लोरिन लावल्याने मरू शकतात, पण याचा जास्त वापर शरीराला घातक ठरू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या