हिंगोलीतील आरोग्य केंद्राची दूरवस्था, शिवसेना खासदारांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी

737

कोरोना आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यामध्ये असलेली सर्व ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी भेट द्यायचं ठरवलं आहे. सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच 20 आणि 21 एप्रिल रोजी पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव या तालुक्यांचा दौरा केला. यावेळी त्यांना बहुतांश आरोग्य केंद्रांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे दिसून आलेय. यामुळे खासदार पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची खरडपट्टी काढली.

हिंगोली जिल्ह्यातीलआरोग्य केंद्र व उपकेंद्रांना दरवर्षी एक ते दीड लाख रुपयांया देखभाल व दुरुस्तीसाठी निधी मिळतो. मात्र या केंद्रांची अवस्था पाहिल्यानंतर हा निधी नेमका वापरला कुठे असा प्रश्न स्थानिकांना पडतो. हेमंत पाटील यांनी हाच प्रश्न अधिकाऱ्यांनाही विचारला. कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस मेहनत घेत आहे. मात्र काही अधिकारी कोरोनातही संधी शोधत असून अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही अशा इशाना खासदार पाटील यांनी दिला आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयासाठी पाच लाख रुपये तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधेसाठी एक लाख रुपयांचा निधी दिल्याचे खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या यावेळी ध्यानात आणून दिले. तरीही या आरोग्य केंद्रांवर पुरेशा सुविधा नसल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पुढच्या चार दिवसात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या स्वच्छतागृहांची साफसफाई, पिण्याचे पाणी, सुस्थितीतील बेड आणि त्यावर चांगल्या चादरी यांची व्यवस्था करा असे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या