होम क्वारंटाईन केलेले तबलिगी जमातचे 10 जण शिरूरमधून पळून गेले

1518
फोटो- प्रातिनिधीक

दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 10 जणांना शिरूरमध्ये होम क्वारंटाईन करण्यात आले होते. शुक्रवारी हे सगळेजण पळून गेल्याची माहिती उजेडात आली आहे. वैद्यकीय मदत पोहचवणाऱ्या ट्रकमधून हे सगळेजण फरार झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे.

होम क्वारंटाईन केलेल्या या सगळ्य़ांना 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील निझामुद्दीन भागात असलेल्या मरकजमध्ये भरवण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते 26 फेब्रुवारीला पुण्याला आले होते. यानंतर अनेकांनी मार्च महिन्यात मरकजमधल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि तिथे बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या 10 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते.

पुणे विभागामध्ये जवळपास 258 असे आहेत ज्यांनी दिल्लीतील जलशाला हजेरी लावली होती. यातल्या 163 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातले 8 जण हे पुण्याबाहेर आहेत मात्र ते राज्यातच वास्तव्य करत आहेत. 72 जण असे आहेत ज्यांचा शोध लागला आहे, मात्र ते राज्याबाहेर आहेत. 15 जणांचा मात्र अद्याप शोध लागू शकलेला नाहीये.

पुणे शहर प्रशासनाने दिल्लीतील कार्यक्रमाला मार्च महिन्यात हजेरी लावणाऱ्या 136 जणांची नावे कळाली आहेत. यातल्या फक्त 78 जणांचा शोध लागला आहे. या सगळ्यांच्या चाचण्या झाल्या असूनत्यातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. ज्या 78 जणांची चाचणी करण्यात आली आहे त्यामध्ये पळून गेलेल्या 10 जणांचा समावेश नाहीये. या सगळ्यांनी फेब्रुवारी महिन्यात मरकजमधल्या कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याने त्यांना 1 एप्रिल रोजी होम क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सगळेजण मूळचे दिल्लीचेच रहिवासी असून ते पुण्यात नाना पेठेतील चांद तारा मशिदीत राहायला आले होते. नंतर ते शिरूरला गेले होते. तिथल्या एका मशिदीमध्येच त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास ते मशिदीतून गायब झाल्याचं निदर्शनास आलं. चौकशी केली असता हे सगळे जण ट्रकमधून दिल्लीला पळन गेल्याचं कळालं. पोलिसांनी मशिदीचा मौलाना आणि ट्रकचालक या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या