खासगी रुग्णालयांद्वारे होणारी लूटमार रोखण्यासाठी यंत्रणा आहे का? हायकोर्टाची सरकारला विचारणा

577

खासगी रुग्णालयात कोविड रुग्णाची लूटमार होत असून पीपीई किट्स, एन 95 मास्क, हॅण्डग्लोव्जच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे उकळले जात आहेत. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची दखल घेत हायकोर्टाने आज खासगी रुग्णालयांना फटकारले. एवढेच नव्हे तर खाजगी रुग्णालयाद्वारे कोविड रुग्णांची लूट होणार नाही ना यासाठी सरकारची काही यंत्रणा आहे का अशी विचारणा खंडपीठाने शासनाला केली.

मुंबई, ठाण्यात खासगी रुग्णालय, नर्सिंग होममध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाची पीपीई किट्स, एन 95 मास्क व इतर साहित्याच्या नावाखाली लूटमार सुरूच आहे. याचिकाकर्ते अ‍ॅड. अभिजित मनगडे यांची आई ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या असता पीपीई किट्स व इतर वस्तूंसाठी त्यांच्याकडून 72 हजार 806 रुपये आकारण्यात आले. तर दादर येथील पुनामिया रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाकडून पीपीई किट्ससाठी 16 हजार रुपये उकळण्यात आले. याचिकाकत्र्यांनी ही बाब आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. निशा मेहरा यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, 21 मे रोजी राज्य सरकारने अध्यादेश काढला असून खासगी रुग्णालयातील बेड व इतर साहित्याच्या दराबाबत काही निकष ठरवले आहेत. त्यावर हायकोर्टाने याबाबत सरकारने काय नियमावली तयार केली आहे त्याची माहिती पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश दिले व सुनावणी 7 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

पीपीई किटचा वापर एकाच रुग्णासाठी नको

पीपीई किट किंवा ग्लोव्हजचा बॉक्स फक्त एका रुग्णासाठीच वापरला जात आहे. परंतु त्याचा उपयोग इतर रुग्णांसाठीही केला जाणे आवश्यक आहे. प्रत्येक पेशंटकडून संपूर्ण किट किंवा संपूर्ण बॉक्सची किंमत आकारून रुग्णालय नफा कमवत आहेत, असे स्पष्ट करत हायकोर्टाने याप्रकरणी खासगी रुग्णालयांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास बजावले.

आपली प्रतिक्रिया द्या