हाऊसिंग सोसायट्यांबाबत पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर बातमी

2633
प्रातनिधिक फोटो

देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांची प्रमाण अधिक आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोणीही नागरीक विनाकारण घराबाहेर येऊ नये यासाठी पोलीस सज्ज आणि सतर्क आहेत. मात्र पोलिसांचे संख्याबळ पाहाता त्यांना सगळीकडे लक्ष ठेवता येणं शक्य होत नाही. यावर मात करण्यासाठी पोलिसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय हाऊसिंग सोसायट्यांबाबत असून यामुळे लॉकडाऊन अधिक प्रभावी होण्यासाठी मदत होईल असा विश्वास पुणे पोलिसांना वाटत आहे.

पुणे पोलिसांनी हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) म्हणून नियुक्त करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मध्ये आयुक्तालयात विशेष पोलिस अधिकारी नेमण्याचे अधिकार पोलिस आयुक्तांना आहेत. तर, जिल्ह्यात हा अधिकार पोलिस अधीक्षकांना आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक भाग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. मात्र, तरीही अनेक सोसायटीतील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरत आहेत. संबंधित नागरिक घराबाहेर पडू नये म्हणून पोलिस काम करत आहेत. पण, सध्या हे काम करण्यासाठी पोलिस मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आता सोसायटीचे अध्यक्ष व सचिव अथवा त्यांनी सांगितलेले व्यक्तीला विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचं ठरवलं आहे. यामुळे त्या व्यक्तीला पोलिसाचे अधिकार मिळणार आहेत. विशेष पोलिस अधिकाऱ्यांना कामांचे वाटप करण्यात आले आहे. सोसायटी संदर्भातील विविध कामे ते करणार आहेत. या व्यक्तींना विशेष पोलिस अधिकारी म्हणून प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. जर त्याचा गैरवापर केला तर त्यांचे पद रद्द केले जाणार आहे. विशेष पोलिस अधिकाऱ्यासाठी साधारण 18 ते 50 वयापर्यंतची व्यक्ती पात्र ठरणार आहे. संबंधित व्यक्ती राजयकी पक्ष, संघटनाशी निगडित नसावी. तसेच त्याला मधुमेह,रक्तदाब असे आजार नसावेत आणि त्याच्याविरोधात गुन्हे दाखल नसावेत अशा अटी आहेत. विशेष पोलिस अधिकारी होण्यासाठी संबंधित व्यक्तीला पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे अर्ज द्यावा लागणार आहे. व्यक्तीची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्याला विशेष पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा दिला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या