औषध पुरवठा न केल्यास जशास तसे उत्तर देऊ! ट्रम्प यांची हिंदुस्थानला उघड धमकी

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला धमकी दिली आहे. अमेरिकेने या औषधांसाठी हिंदुस्थानकडे यापूर्वीही मागणी केली होती. हिंदुस्थानने या मागणीवर अजून निर्णय घेतला नसल्याने अमेरिकेने पुन्हा यासाठी मागणी केली. मात्र ही मागणी करत असतानाच ट्रम्प यांनी हिंदुस्थानला धमकीही दिली आहे. यावेळी त्यांनी (हिंदुस्थानने) मदत नाही केली तर काही हरकत नाही, पण मग आमच्याकडून याला जशास तसे उत्तर दिले जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. शनिवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान त्यांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यामध्ये अमेरिकेला सहकार्य करावे अशी विनंती केली होती.

ट्रम्प यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ चा आमचा पुरवठा सुरू केला तर आम्ही तुमचे आभारी असू. मात्र जर हा पुरवठा सुरू झाला नाही तर तरी काही हरकत नाही. मात्र मग आम्हीही जशास तसं उत्तर देऊ”.

कोरोनाग्रस्तांवर इलाजासाठी अमेरिकेमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. रण्यावर भर देत आहे. हिंदुस्थानात मलेरियावर औषध म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे प्रभावी औषध मानले जाते. हिंदुस्थानात मलेरियाचे रुग्ण आजही आढळत असल्याने या औषधाचे हिंदुस्थानातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करत असतात. कोरोनावरही हे औषध उपायकारक असल्यचे काहींना वाटत असल्याने या औषधाची मागणी जगभरात वाढली आहे. हेच कारण आहे ज्यामुळे जागतिक महासत्ता असलेला अमेरिका हिंदुस्थानकडे या औषदाची याचना करत आहे.  हिंदुस्थानात कच्च्या मालाच्या अभावामुळे या औषधाच्या उत्पादनात घट झाली आहे.

करोनाने अमेरिकेत थैमान घातलेलं असून तिथला कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारपर्यंत तिथे तीन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली होती. तर 10 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी औषध मिळावे यासाठी अमेरिकेत युद्धपातळीवर संघर्ष सुरू आहे. अमेरिकाच नाही तर जगभरातील वैज्ञानिक या आजारावर लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मंगळवारपर्यंत जगभरात कोरोनामुळे 73 हजार 750 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या आजारामुळे जगभरात 13 लाख 28 हजार 150 जण ग्रस्त झाले आहेत. हिंदुस्थानात 4778 जणांना कोरोनाची लागण झाली असून इथे मृतांची संख्या 136 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या