चिकनचे दर 70 टक्क्यांनी घटले; मागणी नसल्याने व्यावसायिक चिंतेत!

981

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे. तसेच त्याचा फटका देशातील पोल्ट्री उद्योगालाही बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे चिकनमुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या अफवा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने चिकनच्या मागणीत महिन्याभरात 50 टक्क्यांनी घट झाली आहे. तर चिकनचे दरही 70 टक्क्यांनी घटले आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

महिन्याभरापूर्वी आठवड्याभरात सुमारे सहा लाख चिकनची विक्री होत होती. ती आता तीन लाखांवर आली आहे. आगामी तीन चार महिन्यात या अफवा कमी झाल्यावर चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळे देशभरात चिकनचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळे चिकनचे दरही मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी शक्यता व्यावसायिक वर्तवत आहेत. मात्र, तोपर्यंत हा व्यवसाय कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. देशभरात सुमारे 4.5 किलो प्रतिव्यक्ती चिकन वर्षभराला लागते. सर्वात जास्त विक्री तामिळनाडूत होते. तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात सर्वात कमी चिकनची विक्री होते. त्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. चिकनमुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होत नसल्याची जनजागृती करण्याची गरज व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या अफवांमुळे महिन्याभरात चिकनची मागणी 50 टक्क्यांनी घटली आहे. तर दरही 70 टक्क्यांनी खाली आले आहेत. त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसत आहे. या अफवांमुळे पोल्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात कोंबड्या शिल्लक आहेत. त्यांची विक्री करण्यासाठी व्यावसायिक कमी किंमतीत त्या विकत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत तीन चार महिन्यांनी मागणी वाढल्यावर कोंबड्यांचा पुरवठा करणे कठीण होणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. चिकनमुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होत नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही चिकनची मागणी घटत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या