… तर पुढील 30 दिवसात देशात 5 लाख 50 हजार कोरोना रुग्ण, आयआयटी गुवाहाटीचा अंदाज

कोरोना विषाणूचा जगभरात थैमान सुरू आहे. जगात कोरोना बाधितांचा आकडा 41 लाखांवर पोहोचला असून मृतांची संख्या 2 लाख 83 हजारांवर गेली आहे. हिंदुस्थानातही दिवसेंदिवस कोरोना विक्राळ रूप धारण करत असून कोरोना रुग्णांचा आकडा 67 हजारांहून अधिक झाला आहे. तसेच 2 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत असून रोज 3 हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. रविवारी रेकॉर्ड 4 हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. विषाणू पसरण्याचा वेग असाच राहिला तर येत्या 30 दिवसात देशातील रुग्णांचा आकडा 5 लाख 50 हजारांवर जाईल, असा अंदाज आयआयटी गुवाहाटीने वर्तवला आहे.

देशात सध्या ‘लॉकडाऊन-3’ सुरू आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सामाजिक संस्था एकवटवल्या आहेत. यातच सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलच्या सहकार्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं (आयआयटी) गुवाहाटी यांनी विविध राज्यांमध्ये येत्या 30 दिवसांत कोरोना संसर्गाचा अंदाज लावण्यासाठी एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. यानुसार देशात येत्या 30 दिवसांत 5 लाख 50 हजार प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

या मॉडेल अंतर्गत राज्ये 3 विभागांमध्ये विभागली गेली आहेत. संशोधकांच्या पथकाने सांगितले की, सध्या लॉजिस्टिक पद्धतीने 30 दिवसांत 1 लाख 50 हजार आणि घातांकीय (एक्सपोनेंशिअल) पद्धतीने 5 लाख 50 हजार प्रकरणे आढळतील अशी शक्यता आहे.

याबाबत बोलताना आयआयटी गुवाहाटीचे प्रोफेसर पलाश घोष म्हणाले की, कोणत्याही एका मॉडेलने केलेला अंदाज योग्य होणार नाही. हे लक्षात घेऊन आम्ही तिन्ही मॉडेल्स एकाच वेळी वापरली आहेत. यासह, दररोज होणारा संसर्ग दर देखील वापरला गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या