जगभरात बाधितांचा आकडा 20 कोटीपार, 18 कोटी नागरिक कोरोनामुक्त

जागतिक महामारी असलेल्या केरोनाचा कहर 200 राष्ट्रांत पसरला आहे. त्यामुळे आतापर्यंत या महामारीने 20 कोटी नागरिकांना बाधित केले असून 42 लाख 63 हजार 352 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 कोटी 4 लाख 60 हजार 325 बाधितांपैकी 18 कोटी 6 लाख 78 हजार 758 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 कोटी 55 लाख 18 हजार 215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिका, हिंदुस्थान आणि ब्राझीलला बसला आहे.

अमेरिकेत 3 कोटी 60 लाख बाधित आढळले असून 6 लाख 30 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानमध्ये 3 कोटी 17 लाख बाधित तर 4 लाख 25 हजार मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये दोन लाख बाधित तर 5 लाख 58 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाव्यतिरिक्त रेस्पिरेटरी सेन्सिशयल व्हायरसच्या (आरएसव्ही) रुग्णांत वेगाने वाढ झाली आहे. या विषाणूमुळे श्वसनासंबंधी समस्या निर्माण होतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर दिसून येतो. नाक वाहणे, सर्दी, खोकला, ताप अशी त्याची लक्षणे आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटसोबतच ‘आरएसव्ही’बाबतही चिंता व्यक्त केली आहे.

इस्रायल, ब्रिटननंतर जर्मनीही देणार बूस्टर डोस

जर्मनी सप्टेंबरपासून कोरोना लसीचे बूस्टर डोस देण्यास सुरुवात करणार आहे. अधिकारी म्हणाले, हे डोस कमकुवत आरोग्य असलेल्या व वृद्धांना दिले जातील. युरोपीय संघाचे अधिकारी बूस्टर डोसला विरोध करत आहेत. कमी लसीकरण झालेल्या देशांत आधी लस पाठवली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. गेल्या आठवडय़ापासून इस्रायलमध्ये वृद्धांना लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या