कोरोना ‘मानवनिर्मित’, प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आलाय व्हायरस, नितीन गडकरींचे मोठे विधान

2209
nitin-gadkari

जगभरात धुमाकूळ घातलेल्या आणि हिंदुस्थानमध्येही जम बसवलेल्या कोरोना विषाणूबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. लाखो लोकांचा जीव घेणारा कोरोना विषाणू नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. हा व्हायरस प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे, असे विधान नितीन गडकरी यांनी केले. ‘एनडीटीव्ही’ शी बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केले आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकायला हवे. हा विषाणू नैसर्गिक नाही, मानवनिर्मित आहे. जगातले अनेक देश यावर लस शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. सध्या लस उपलब्ध नसली तरी लवकरच लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. मग काही अडचण उरणार नाही, असेही ते म्हणाले.

तसेच सध्या कोरोना विषाणूसह आर्थिक स्तरावरही लढाई सुरू आहे. हिंदुस्थान गरीब देश असून लॉकडाऊन आता अधिक वाढवू शकत नाही. आम्हाला सुरक्षेच्या उपायांसह बाजार खुले करावे लागतील. तसेच अमेरिका, ब्रिटन, इटली सारख्या देशांच्या तुलनेत आपला देश सुरक्षित स्थितीत दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आहे. मात्र आपल्याला कोरोनासोबत कसे जगायचे हे शिकायला हवे, असेही ते म्हणाले.

देशातील रुग्णांचा वाढता आलेख
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या 78 हजारांवर पोहोचली आहे. यामुळे आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून 25000 हुन अधिक रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. देशात गेल्या 7 ते आठ दिवसात दररोज 3 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. लॉकडाऊन असतानाही रुग्णांचा वाढत आलेख चिंताजनक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या