जालन्यातील 115 जवानांसह 158 जणांचे अहवाल निगेटिव्ह

246

जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील 115 जवानांसह एकूण 158 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह झाले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि मुंबई येथे बंदोबस्तासाठी गेलेले जालना येथील राज्य राखीव दलाचे जवान काही दिवसांपूर्वी जालना येथे परतले होते. दोन वेगवेगळ्या तुकड्यांमधील एकूण 115 जवानांना जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आले आहे. या जवानांसह जालना शहर व जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले व्यक्ती आणि संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले 46 जण असे एकूण 161 जणांच्या लाळेचे नमुने मंगळवारी सायंकाळी घेण्यात आले होते. सदर नमुने बुधवारी सकाळी संभाजीनगर येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा याबाबतचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला .

या 161 जणांपैकी तिघांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.यातील कोरोनाची लागण झालेल्या महिलेचे माहेर सिद्धेश्वर पिंपळगाव ता.अंबड असल्याने ती आपल्या पती व दिरासह मुंबई येथून थेट सिद्धेश्वर पिंपळगावला गेली होती. सरपंच आणि इतर ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे या तिघांनाही अंबड येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे लागले. दरम्यान,161 जणांपैकी 115 जवानांसह पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि संशयीत म्हणून दाखल असलेल्या व्यक्ती मिळून 158 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या