#Corona जनता कर्फ्युला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोरोना व्हायरसचा विळखा रोखण्यासाठी देशभरात रविवारी लॉकडाऊनला सर्वच क्षेत्रातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांनी आपापल्या परीने कोरोनाला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. हिंदुस्थानात कोरोना व्हायरसचे ३९६ रुग्ण आढळले असून, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यु सहभागी होत सायंकाळी कोरोनासाठी लढलेल्या सर्वांचे आभारही मानले आहेत.

दीड महिन्यापूर्वी चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना व्हायरसने मार्च महिन्याच्या सुरुवातीला हिंदुस्थानात प्रवेश केला आहे. हिंदुस्थानात केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, मात्र हळूहळू देशभरातील २५ राज्यांत विदेशात गेलेले नागरिक व विदेशी पर्यटकांनी देशात रुग्ण वाढविण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना व्हायरसची तपासणी साडेचार हजारांत
केंद्र सरकारने शनिवारी कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिली आहे. आयसीएमआरच्या निर्देशानुसार एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळांना चार हजार पाचशे रुपयांत ही तपासणी करता येणार आहे. संशयित रुग्णांसाठी स्क्रिनिंग तपासणीसाठी एक हजार पाचशे रुपये तर कन्फर्मेशन चाचणीसाठी अतिरिक्त तीन हजार रुपये दर ठरविण्यात आले आहेत. यामध्ये अतिरिक्त शुल्क आकारलेल्या प्रयोगशाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दिल्लीत कोरोनाचे आणखी ७ रुग्ण
राजधानी दिल्लीत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी एका दिवसात ७ रुग्ण वाढले असून, आतापर्यंत २७ रुग्णसंख्या झाली आहे. शनिवारपर्यंत दहा हजार नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दिल्ली सरकारच्या वतीने नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, मात्र वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. कोरोना व्हायरससाठी असलेल्या हेल्पलाईनवर मोठ्या संख्येने कॉल येत असून, एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी लॉकडाऊनला प्रतिसाद देत यापुढे आवश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शाहीनबागेत कोरोनाचा संशयित, जनता कर्फ्युवरून आंदोलकात वाददिल्ली येथे शाहीनबागेत सुरू असलेल्या सीएएच्या विरोधातील आंदोलनात कोरोना संशयित आढळल्याने खळबळ उडाली आहे. देशासाठी पुकारलेल्या जनता कर्फ्युत काही काळ आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती, मात्र त्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याचे सांगण्यात आले. या आंदोलन परिसरात पेट्रोल बॉम्ब फेकल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली असून, पोलिसांच्या सतर्कतेने दोन गटातील वाद तात्काळ निवळला होता. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्व उपाययोजना या ठिकाणी वापरल्या जात आहेत. आंदोलकांना सॅनिटायझर, मास्कचा वापर सक्तीचा केला गेला आहे.

भोपाळमध्ये विमानतळावर संशयित
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये रविवारी विमानतळावर कोरोना संशयित आढळल्याने खळबळ उडाली. आतापर्यंत राज्यात ३९६ संशयित असून, ६ जण पॉझिटिव्ह आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह मुख्य सचिवांनी प्रशासनाला संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मोलमजुरी करणाऱया व छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचे आश्वासन कमलनाथ यांनी दिले आहे. नवीन सरकारने याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये तीन रुग्ण आढळले असून, भोपाळमध्ये दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ऋषिकेशमध्ये थांबलेली ऑस्ट्रेलियातील आजारी महिला बेपत्ता
उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसचे २८ रुग्ण आढळल्याने सर्व राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आवश्यक असलेल्या सेवा वगळून सर्व व्यवहार बंद केले आहेत. ऋषिकेशमध्ये काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातून राहण्यासाठी आली होती. काही दिवसांपासून आजारी असलेली ही महिला शनिवारी बेपत्ता झाल्याने पोलीस व आरोग्य विभागाचे पथक शोधण्यासाठी रवाना झाले आहे.

0उत्तराखंडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. तसेच अमेरिकेत मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेचा शनिवारी अचानक मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी आरोग्य व पोलीस यंत्रणा मृत्यूची चौकशी करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या