corona virus – मध्य प्रदेशात पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल

948

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला हजर राहिलेल्या एका पत्रकाराविरोधात भोपाळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या पत्रकाराची मुलगी लंडनवरून परत आली होती. तिला कोरोना आजाराची लागण झाल्याचे वृत्त मध्य प्रदेशातील स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे. तिच्या संपर्कात आल्याने पत्रकारालाही कोरोनाची लागण झाल्याचे या वृत्तपत्रांनी म्हटले आहे. हा पत्रकार कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला हजर राहिला होता, ज्यामुळे आणखी काही जणांना या आजाराची लागण झाली असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पत्रकाराला हे माहिती होते की आपल्या कोरोनाची लागण झालेली असू शकते. तिच्या संपर्कात आल्याने आपल्यालाही आजार होऊ शकतो हे माहिती असूनही पत्रकार परिषदेला हजेरी लावल्याने पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 मार्च रोजी कमलनाथ यांची पत्रकार परिषद झाली होती, ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारामुळे या पत्रकार परिषदेला हजर असलेल्या सगळ्या पत्रकारांना विलगीकरणात जावं लागणार आहे. या पत्रकार परिषदेला कमलनाथ यांच्याशिवाय दिग्विजय सिंह, काँग्रेस आमदार आणि जवळपास 200 पत्रकार उपस्थित होते. इथे हजर असलेल्यांची एकूण संख्या 1 हजाराच्या आसपास होती. कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय असणारा पत्रकार हा मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये तसेच भाजपच्या कार्यालयातही गेला होता. याशिवाय त्याने एका वृत्तवाहिनीच्या चर्चात्मक कार्यक्रमातही भाग घेतला होता. वृत्त वाहिनीचे कार्यालय या घटनेनंतर संपूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या