corona virus – रत्नागिरीला उतरलेले ते 3 प्रवासी कोण होते?

2444
ratnagiri-railway-station

18 मार्च रोजी सीएसएमटी-मंगळुरू या गाडीने प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रचंड धावपळ करायला सुरुवात केली आहे. या तीन प्रवाशांच्या बोगीत एक कोरोनाग्रस्त रुग्ण बसलेला होता. या रुग्णामुळे तीन प्रवाशांनाही संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच त्यांच्या शोधासाठी ही धावपळ सुरू झाली आहे. ज्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाली होती तो दुबईवरून हिंदुस्थानात परतला होता. हा रुग्ण भटकळ स्थानकात उतरला होता, मात्र त्याच्या सोबत बोगीमध्ये असलेले 3 प्रवासी हे रत्नागिरीला उतरले होते. या तीन जणांमुळे कोरोनाचा संसर्ग आणखी फैलावण्याची शक्यता असल्याने या तिघांचा लवकरात लवकर शोध लागणं अत्यंत गरजेचे आहे.

दक्षिण रेल्वेने कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कळवलं होतं की त्यांना सीएसएमटी-मंगळुरू गाडीने प्रवास केलेला 72 वर्षांचा एक प्रवासी असा सापडला आहे ज्याला कोरोनाची लागण झाल्याचं पक्के निदान झाले आहे. हा प्रवासी 18 मार्चला या गाडीमध्ये बसला होता आण दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मार्च रोजी कर्नाटकातील भटकळ इथे उतरला होता. उडुपी इथे या प्रवाशाची चाचणी झाली आणि चाचणी अहवालात त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. हे निदान झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण रेल्वेने कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळवली होती, जेणेकरून त्याच्यासोबत प्रवास करणारे आणि महाराष्ट्रातच गाडीतून उतरणाऱ्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांचीही चाचणी करता येईल. या गाडीतून कोरोनाग्रस्त प्रवाशाच्या बोगीतून प्रवास केलेले आणि महाराष्ट्रात उतरलेले एकूण २० प्रवासी होते. त्यातल्या 17 जणांनी त्यांची संपूर्ण माहिती आरक्षण करताना भरली होती. 3 प्रवाशांनी मात्र ही माहिती दिली नव्हती. यामुळे हे तीन प्रवासी कोण आहेत हे शोधणं आता अवघड काम बननलं आहे. हे तिघेजण रत्नागिरी स्थानकात उतरल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना आहे.

दुबईवरून हिंदुस्थानात परतलेला प्रवासी हा S3 बोगीतील 49 नंबरच्या सीटवरून प्रवास करत होता. त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला होता अथवा नाही हे कळू शकलेलं नाहीये. मात्र मुंबई महापालिकेने इतर देशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर हा शिक्का मारणं बंधनकारक केलं आहे. अशा प्रवाशांना सक्तीने 14 दिवस घरातच इतरांपासून विलग होणं गरजेचं आहे. असं असतानाही हा प्रवासी प्रवास करून भटकळला कसा पोहोचला हे एक मोठं कोडं आहे.

या गाडीच्या S3 बोगीतून प्रवास करणारे 11,12,13 या सीटवरील प्रवासी रत्नागिरीला उतरले होते. ते कोण होते हे कळू शकलेलं नाहीये, आणि या तिघांचा सध्या शोध घेण्याचं काम सुरू आहे. कोरोनाग्रस्त प्रवाशासोबत प्रवास करणाऱ्या 50,51 या दोन सीटवरील प्रवाशांनी तत्काळ कोरोनाची चाचणी करून घेणं गरजेचं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. कोरोनाग्रस्ताजवळ बसल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता दाट आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यापूर्वी आणि रेल्वेसेवा पूर्णपणे बंद होण्याआधी प्रशासनाने परदेशातून आलेल्या आणि हातावर शिक्का असलेल्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वेगळी व्यवस्था करून द्यावी असे निर्देश दिले होते. मात्र तरीही काहीजण लपूनछपून रेल्वेने आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत होते. हातावर शिक्का दिसल्याने या प्रवाशांना काही ठिकाणी त्यांच्यासहप्रवाशांनी गाडीबाहेर काढल्याच्या घटना घडल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या