कोरोनाची लागण झाल्याचे सांगत पोलीस ठाण्यात मनोरुग्णाचा धुमाकूळ

मला कोरोनाची लागण झाली आहे असे म्हणत पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या मनोरुग्णाने धुमाकूळ घातला. या मनोरुग्णाने पोलीस ठाण्यातील साहित्याची तोडफोड केली. हा खरोखर कोरोनाग्रस्त असेल तर ? या विचाराने पोलीस सुरुवातीला त्याला हात लावण्यास घाबरत होते. मात्र नंतर तो मनोरुग्ण असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

विवेकानंद पोलीस ठाण्यामध्ये जियाउद्दिन खुदबुद्दीन सय्यद (राहणार बालाजीनगर) हा मनोरूग्ण घुसला. चौकीतील कॉप्युटर, केबिन काच, सोनी कंपनीचा लॅपटॉप याची त्याने तोडफोड केली. किमान एक तास या व्यक्तीचा गोंधळ चालू होता. पोलीस ठाण्यात पोहोचण्यापूर्वी त्याने दोन लोकांना जखमी केले होते. पोलीस ठाण्यात घुसण्याच्या आधीपासून त्याने ‘मला कोरोना झालाय’ असं ओरडायला सुरुवात केली होती. त्याने पोलीस ठाण्याच्या आतील पोलीस कर्मचाऱ्यांवर थुंकायला सुरुवात केली. संसर्गाच्या भीतीने API व इतर पोलिस कर्मचारी धावत पोलीस ठाण्याच्या बाहेर आले. काही पोलिसांनी त्याच्यावर निर्जंतुकीरणासाठीचाफवारा मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो फवारा हिसकावुन घेवून त्याने जमिनीवर आपटला. काहीवेळाने पोलिसांना हा माणूस मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी सय्यदला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

आपली प्रतिक्रिया द्या