लॉकडाऊनमध्ये शेजारणीला बाईक चालवायला शिकवत होता, पुढे काय झालं वाचा सविस्तर

5078
फोटो- प्रातिनिधीक

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडू नका असं प्रशासन, पोलीस कानीकपाळी ओरडून सांगत आहे. मात्र नाठाळ काही ऐकायला तयार नाही. वाट्टेल त्या कारणासाठी ते बाहेर पडत असून अनेकांना पोलिसांचा प्रसादही मिळाला आहे. उत्तर प्रदेशात पोलिसांनी आग्र्यातील हरीपर्वत भागात पोलीस गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एका महिलेला बाईक चालवताना बघितलं. तिच्या मागे एक तरुण बसला होता. या दोघांना पोलिसांनी बाजूला घेतलं आणि बाहेर का पडलात याचं कारण विचारलं. यावर दोघांनी जिल्हा रुग्णालयात औषधं आणायला चाललो असल्याचं सांगितलं.

गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोलिसांची तुकडी गस्त घालत होती. यावेळी त्यांना एक महिला बाईक चालवत असल्याचं दिसलं. तिच्या पाठी एक तरुण होता. पोलिसांना बघून ते बहुधा घाबरले होते. बाईक एका चौकातून वळवताना महिलेचं संतुलन बिघडलं, बाईकचा वेग कमी असल्याने दोघे पडले खरे मात्र त्यांना फार लागलं नाही. पोलीस पटकन त्यांच्या मदतीसाठी धावले आणि त्यांना बाहेर पडण्याचं कारण विचारलं. सुरुवातीला महिला आणि तरुणाने अशीच फेकाफेकी करून बघितली, मात्र पोलिसांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. अखेर तरुणाने सांगितलं की तो या महिलेच्या शेजारी राहतो आणि महिलेला बाईक शिकायची होती म्हणून तो शिकवत होता.

पोलिसांनी तरूणाकडे वाहन चालवण्याचा परवाना मागितला. तो त्याच्याकडे नव्हता. गाडीची कागदपत्रे मागितली ती देखील त्याच्याकडे नव्हती. दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेलं नव्हतं. यामुळे पोलिसांनी या दोघांविरूद्ध कारवाई केली आणि 3500 रुपयांचा दंड वसूल करून दोघांना सोडून दिलं. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडलात तर याद राखा असा दमही पोलिसांनी दोघांना दिला.

आपली प्रतिक्रिया द्या