घरच्या ओढीने 3 दिवस चालत होती, गाव अर्धा तासावर असताना मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला

993
प्रातिनिधिक

लॉकडाऊन झाल्यानंतर घर गाठण्याच्या ओढीने गरिबांनी आणि मजुरांनी पायी चालत जाण्याचं ठरवलं. 12 वर्षांच्या एका मुलीलाही कसंही करून घर गाठायचं होतं. यासाठी ती प्रवासाला निघाली खरी, मात्र ती घरापर्यंत पोहोचलीच नाही. हादरवून टाकणारी ही घटना छत्तीसगडमधल्या बीजापूर भागातील आहे. ही मुलगी घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शेतात मजुरी करायला तेलंगाणामध्ये गेली होती.

जमलो मकदम असं या मुलीचं नाव आहे. खेळण्या-बागडण्याच्या दिवसात तिला घर चालावं यासाठी कामाला जुंपावं लागलं होतं. कोरोनाच्या उद्रेकामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पहिले 21 दिवस जमलोने कसेबसे ढकलले, मात्र लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा झाली तेव्हा मात्र ती कोलमडीन पडली. कामावर जायचं नसल्याने तिने 150 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव गाठायचं ठरवलं. कोणतंही वाहन उपलब्ध नसल्याने अखेर तिने चालायला सुरुवात केली. सलग तीन दिवस ती चालत होती. चालून चालून तिची अवस्था प्रचंड वाईट झाली होती. तिच्यासोबत असणाऱ्यांनी सांगितले की ती इतकी चालली की अतिश्रमाने तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. दु:ख बाजूला सारून ती चालत राहिली. गाव अर्धा तासावर असताना ती रस्त्यातच कोसळली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला.

जमलो ही तेलंगाणामध्ये मिरची तोडण्याचं काम करायला गेली होती. लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवल्यानंतर तिने इतर मजुरांसोबत गाव गाठायचं ठरवलं. मुख्य रस्त्या सोडून या सगळ्यांनी जंगलातील रस्ता धरला होता, कारण तो गावाला लवकर पोहचवणार होता. संपूर्ण प्रवासात तिने नीट खाल्लंही नव्हतं. जमलो पोटदुखीने बेजार झाली होती आणि तिला उलट्या होत होत्या. तिचं गाव अवघ्या 14 किलोमीटरवर आलेलं असताना तिच्या सहनशक्तीचा बांध तुटला आणि ती जागीच कोसळली. सदेह घरी पोहोचण्याची जमलोची इच्छा अपूर्णच राहिली. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टेमनंतर सांगितलं की ती कुपोषित होती आणि शरिरातील पाणीही कमी झालं होतं. या मुलीच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर छत्तीसगड सरकारने मुलीच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत घोषित केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या