संपूर्ण देशासाठी पुढचे 125 दिवस अत्यंत महत्वाचे!

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता कमी होऊ लागली आहे, मात्र त्याचवेळी लोकांचा बेजबाबदारपणा वाढीस लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हिंदुस्थानात हर्ड इम्युनिटी अजूनही निर्माण होऊ शकली नसल्याचं म्हटलंय. यामुळे कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा नव्याने उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती, ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी वर्तवली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पुढचे 125 दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

देशात हर्ड इम्युनिटी अजूनही निर्माण होऊ शकली नसल्याने कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा नव्याने उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कोरोनाचा हा उद्रेक थांबवणे तातडीचे असल्याचं पॉल यांनी म्हटलंय. कोरोना रोखण्यासाठीचे आखून दिलेले नियम पाळल्यास हे शक्य होऊ शकेल आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये येणारे 125 दिवस हे अत्यंत महत्वाचे असतील असे निती आयोगाचे सदस्य असलेल्या डॉ.पॉल यांनी म्हटलं आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या कमी व्हायला लागल्याने काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेत लोकं कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचं दिसून आलं आहे. मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येत असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलंय की जनजीवन पूर्वपदावर आणत असताना तोंडावर मास्क लावण्याचे प्रमाण घटले आहे. अग्रवाल यांनी सांगितले की मास्क लावणे अत्यंत गरजेचे असून त्याचा वापर थांबवला जाऊ नये.

शेजारी राष्ट्रांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढायला लागली आहे. म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश या देशांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते आहे. मलेशिया आणि बांग्लादेशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसऱ्या लाटेचे शेपूट अद्याप वळवळते आहे

केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडून राज्याला कोरोना स्थितीबाबत वेळोवेळी होत असलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार मानले. दुसऱ्या लाटेचे शेपूटदेखील अद्याप वळवळते आहे. असे असताना रुग्णसंख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडताहेत, गर्दी करताहेत. रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरू झाले आहे. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करते आहेच, पण केंद्रीय पातळीवरूनदेखील आपल्याला काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे लागेल असे दिसते, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत म्हटले.

सहा राज्यांमध्ये चिंताजनक स्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, आधी तज्ञांचं असं म्हणणं होतं की, ज्या राज्यांमधून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. देशातले 80 टक्के कोरोनाबाधित हे याच सहा राज्यांमधले आहेत. तसेच 84 टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचंही ते म्हणाले. ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे त्या राज्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करून कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी.

लस कोरोनाशी लढण्याचे अस्त्र

जसजशी रुग्णवाढ होते तसतसा हा विषाणू आपली रूपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात आपण आधी ही रणनीती अवलंबली आहे. आताही आपल्याला तेच करायचं आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि आता लसीकरणाच्या रणनीतीच्या आधारावर आपल्याला पुढे जायचं आहे. तसंच ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं तसंच मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर कोरोनाशी लढण्याचं एक अस्त्र म्हणून करायचा आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या 23 कोटींच्या कोरोना पॅकेजचा वापर वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करण्यासाठी करायला हवा, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या