वाढदिवसाच्या केकसाठी पोलिसांशी हुज्जत घातली, पिंपरीत दोघींविरोधात गुन्हा दाखल

1049

वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घ्यायला बाहेर पडलेल्या दोन तरुणींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केकशिवाय वाढदिवस साजराच होऊ शकत नाही अशी संकल्पना अनेकांच्या डोक्यात  फिट्ट बसली आहे. अशाच विचाराच्या दोन तरुणी पिंपरीमध्ये केकचं दुकान शोधायला बाहेर पडल्या होत्या. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातीलच नाही तर देशातील सगळी दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक काम नसेल तर लोकांनी बाहेर पडू नये असं वारंवार सांगितलं जात आहे. हे माहिती असूनही या तरुणी घराबाहेर निघाल्या होत्या. त्यांना पाहताच पोलिसांनी त्यांना हटकले आणि काय काम आहे असे विचारले. यावर तरुणींनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

Video – घरच्या घरी तयार करा हा सोप्पा केक

 

ही घटना बुधवारची असून, वाकड परिसरात हा प्रकार घडला आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणारी यंत्रणा कार्यरत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांना घरातच बसून राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेशही काढण्यात आले आहेत. अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर येऊन सामाजिक अंतर राखून काम होताच घरात जाण्यासाठी प्रशासनाची ना नाही. असे असताना वाकड परिसरात अंदाजे 25-26 वयाच्या दोन तरुणी घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्या दोघी केक घेऊन जाताना पोलिसांच्या नजरेस पडल्या. पोलिसांनी त्यांना घराबाहेर फिरण्याचे कारण विचारले. मात्र, कारण न सांगता तरुणींनी सरळ पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. बराच वेळ हुज्जत घातल्यानंतर वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणींवर गुन्हा दाखल करा, असे पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. गुन्हा दाखल होण्याचे ऐकताच तरुणींनी लगेच नारमाईची भूमिका घेतली. मात्र, पोलिसांपुढे हुज्जतीनंतरच्या माफीचा काहीही उपयोग झाला नाही. दोन्ही तरुणींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे वाढदिवसाचा केक आणणे तरुणींना चांगलेच महागात पडले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या