बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आमदारांची होणार कोरोना तपासणी; मध्य प्रदेश सरकारचा निर्णय

हिंदुस्थानातही कोरोना फैलावत आहे. त्यातच आता मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींमुळे कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. मात्र, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वी भोपाळमध्ये परतलेल्या आमदारांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती मंत्री पी.सी. शर्मा यांनी दिली आहे. काँगेसच्या जयपूरहून आलेल्या आमदारांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले. त्याचबरोबर हरियाणा आणि बंगळुरुत असणाऱ्या आमदारांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. भोपाळमध्ये परतलेल्या सर्व आमदारांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर राजभवानातून कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थिती बघता सरकारने सदनात विश्वास गमावला असून सरकार अल्पमतात असल्याचे दिसून येत आहे. ही गंभीर राजकीय परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 16 मार्चला सदनात बहुमत सिद्ध करावे, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

काँग्रेसचे बंडखोर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांच्या समर्थक 22 आमदारांनीही राजीनामा दिला. त्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय संकट निर्माण झाले आहे. शिंदे यांनी भाजपात प्रवेश केल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे राजकीय परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. त्यातच सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या