मुंबईत 70 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, व्हेंटिलेटर्स ओस पडू लागले

1713

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून मुंबईत हे प्रमाण 70 टक्के इतके झाल्याने मुंबईकरांना आता कोरोनाची भीती बाळगायची गरज उरलेली नाही. मुंबईतील विविध कोरोना रुग्णालयांमध्ये सध्या 1053 व्हेंटिलेटर्स असून त्यापैकी 125 व्हेंटिलेटर्सचा तर अजूनही वापर झालेला नाही. व्हेंटिलेटर्सची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्याच कमी झाली आहे, हे चांगले संकेत असून कोरोनाचा धोका वेगाने कमी होत असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे.

सध्या कोरोना रुग्णालयात असलेल्या 1053 व्हेंटिलेटर्सपैकी 125 व्हेंटिलेटर्सचा वापरच झाला नाही. त्यात केंद्र सरकारने मुंबई महानगरपालिकेला पीएम केअर फंडातून टप्प्याटप्प्याने दिलेल्या 446 व्हेंटिलेटर्सचा वापर पालिका आवश्यकतेनुसार करत आहे.

धारावीत फक्त 99 सक्रिय रुग्ण
– धारावीत मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून आता धारावीत केवळ 99 सक्रिय रुग्ण आहेत तर 2,067 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 96 हजार 256 कोरोनाबाधित असून त्यापैकी 67 हजार 830 कोरोनामुक्त झाले असून सध्या 22 हजार 959 सक्रिय रुग्ण आहेत. एकेकाळी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आता मात्र सक्रिय रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे.

संसर्गाचे प्रमाण लवकरच 1 टक्क्यापर्यंत येईल!
मुंबईत सुरुवातीला कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त होते. एका कोरोना रुग्णापासून 9 व्यक्तींना संसर्ग होत होता. मात्र, आता हे प्रमाण झपाटय़ाने कमी झाले असून एका रुग्णापासून केवळ 1.1 व्यक्तींना याची लागण होत आहे. जेव्हा संसर्गाचे प्रमाण हे 1 टक्क्यापेक्षा कमी येईल, त्यावेळी कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे, असे म्हणता येईल. मुंबईतील संसर्गाचे प्रमाण हे लवकरच 1 टक्क्यापर्यंत येईल, अशी परिस्थिती आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या