डॉक्टरांवर थुंकले, गैरवर्तन केले; मरकजमधून सोडवलेल्यांना इतरत्र हलवण्याची विनंती

11426

दिल्लीतील निजामुद्दीन इथल्या तबलिगी जमातच्या मरकजमधून 2 हजारपेक्षा अधिक लोकांना बुधवारी बाहेर काढण्यात आले आणि हे मरकज म्हणजेच केंद्र पूर्णपणे रिकामे करण्यात आले. या मरकजमधून बाहेर काढलेल्यांना विविध ठिकाणी हलवण्यात आले आणि त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची खातरजमा करण्यास सुरूवात झाली. यातल्या 167 जणांना रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या क्वारंटाईन केंद्रावर ठेवण्यात आले होते. इथे ठेवलेल्या सगळ्यांनी उच्छाद मांडायला सुरुवात केली आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत गैरवर्तन करायला सुरुवात केल्याची धक्कादायक माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.


उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की ‘हे लोकं वाट्टेल ते खायला मागत होते. क्वारंटाईन केंद्रावरील लोकांशी गैरव्यवहार करत होते. यातील अनेकांनी या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर थुंकायला सुरुवात केली. कोणाचंही न ऐकता संपूर्ण इमारतीमध्ये त्यांनी फिरायला सुरुवात केली.’

या त्रासाला कंटाळून रेल्वे अधिकाऱ्यांनी कडक सुरक्षा व्यवस्था असेल किंवा इतर कोणत्याही सुरक्षित स्थळी या सगळ्यांना हलवण्यात यावे अशी विनंती केली. ही विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली असल्याची माहिती प्रवक्ते दिपक कुमार यांनी दिली आहे. बुधवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी 4 कॉन्स्टेबल आणि 6 CRPF जवानांना या केंद्रावर तैनात केलं आहे. 167 जणांपैकी 97 जणांना डिझेल शेड ट्रेनिंग हॉस्टेलमध्ये तर इतर 70 जणांना RPF च्या बराकीत ठेवण्यात आले आहे.

तबलिगी जमात आणि मरकज म्हणजे काय ?
तबलीगचा अर्थ हा अल्लाह,कुराण आणि हदीसमधल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहचवणे जमातचा अर्थ हा गट असा होतो. हो देन शब्द जोडल्यास त्याचा अर्थ इस्लाममधल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहचवणारा गट असा अर्थ होतो. मरकजचा अर्थ ‘ केंद्र’ असा आहे. जवळपास 75 वर्षांपूर्वी मेवातच्या मौलाना इलियास यांनी मरकजची स्थापना केली होती. या केंद्र स्थापनेमागचा त्यांचा उद्देश अत्यंत चांगला होता. अशिक्षित मुसलमानांना वाममार्गाला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना इस्लामने सांगितलेल्या रस्त्यावर आणि नमाजकडे आकर्षित करणं हा या केंद्राचा उद्देश होता. मुसलमानांनी नमाझ पढावा, रोजे पाळावेत, वाईट गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवावे, सत्याच्या मार्ग अवलंबावा यासाठी हे या केंद्राचे मुख्य उद्देश आहेत. या उद्देशांमुळेच अल्पावधीत दिल्लीतील निजामुद्दीन भागातील हे मरकज देशविदेशात प्रसिद्ध झाले. जगभरातून अनेकजण इथे यायला लागले. वाईटाकडून चांगल्याकडे मार्गक्रमणासाठी हे केंद्र मार्गदर्शन करायला लागले.

मरकजचा एक प्रमुख असतो ज्याला ‘अमीर’ म्हटलं जातं. त्याच्या सल्ल्यानुसार देशविदेशातील गट ज्यांना जमात म्हटलं जातं ते इस्लामच्या गोष्टी इतरांपर्यंत पोहचवण्याचे काम करतात. वाईट गोष्टी सोडा, चांगल्या गोष्टींची कास धरा, सत्याच्या मार्गावर चाला असा या जमाती संदेश देत असतात. नव्या सदस्यांना या जमाती जोडत असतात. या सदस्यांना मशिदीत जाणाऱ्या जमातीमध्ये सहभागी होण्यास सांगतात. मशिदींमध्ये या जमातीची एक समिती बनते ज्यातील सदस्यांची यादी ही मरकजला पाठवली जाते.

प्रत्येक जिल्ह्यात, राज्यात या जमातीचा प्रमुख म्हणजेच अमीर असतो. त्याचा आदेश मानणं हे जमातीतील प्रत्येकाला बंधनकारक असतं. जगभरातील सगळ्या जमातींवर निजामुद्दीन इथल्या मरकजचा अंकुश असतो. तबलिगी जमातीचे जलसे देशाच्या विविध भागात दरवर्षी होत असतात. या जलशांसाठी मोठी गर्दी होत असते. या जमातीचं मानणं आहे की देशात कोणतंही नुकसान झालं तर ते संबंधित यंत्रणेला दोष देण्याऐवजी स्वत:ला दोष देतात. खुदाने आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी जगात पाठवलं आहे. वाईट गोष्टी या इस्लामने सांगितलेल्या रस्त्यावरून भरकटल्याने किंवा भलाईचा मार्ग सोडल्याने घडतात असं या जमातीचं मानणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या