चिनी सरकारची आगळी मोहीम; कोरोना झाल्याची कबुली देणाऱ्या रुग्णाला 10 हजार युआन

फोटो- प्रातिनिधीक

जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा मोठा धसका चिनी सरकारने घेतला आहे. आतापर्यंत 2800 नागरिकांचा बळी घेणाऱया या रोगाची लागण चीनमधील सुमारे 80 हजार नागरिकांना झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चिनी प्रशासनाने आता या रोगाचे रुग्ण शोधण्यासाठी वेगळीच शक्कल लढवलीय. ज्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली असेल त्याने तशी कबुली दिल्यास त्याची चाचणी घेतली जाईल. तो रुग्ण कोरोनाग्रस्त असल्यास चीन सरकार त्याला 10 हजार युआन इनाम देऊन त्याच्यावर योग्य ते उपचारही करणार आहे.

चीनच्या कोरोनाग्रस्त हुबेई प्रांताच्या नजीकच्या प्रांतांतही आता नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच हुबेईच्याच कियानजिंग, हानयांग आणि हुआंगगुआंग प्रशासनांनी कोरोनाची माहिती देणाऱया रुग्णाला 10 हजार युआन बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. चीनच्या एका हुबेई प्रांतातच कोरोनाचे 65 हजार रुग्ण आढळले असून 2,600 नागरिकांचा या आजाराने बळी घेतला आहे. याशिवाय जियांगशी आणि हेबेई या स्थानिक प्रशासनांनी अशी माहिती देणाऱया रुग्णांना 300 ते 500 युआन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पाकिस्तानातही कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.

जपानमधून गोव्याचे 50 खलाशी मायदेशी परतणार

जपानच्या किनाऱयावर अनेक दिवस रोखण्यात आलेल्या डायमंड प्रिन्स गोव्याच्या 50 खलाशांना इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने मायदेशी आणले जात आहे. जहाजावरील 14 हिंदुस्थानी खलाशांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे अशा खलाशांना दिल्ली विमानतळावरून उपचारासाठी विशेष रुग्णालयांत पाठवले जाणार आहे. या जहाजावर अडकलेल्या 124 हिंदुस्थानी खलाशांना एअरलिफ्ट करीत विमानाने मायदेशी आणले जात असल्याची माहिती अनिवासी हिंदुस्थानी आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या