जिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण पळाला, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

810

संभाजीनगरमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोनाग्रस्त रुग्णालयातून पळाला. ही घटना रविवारी म्हणजेच 17 मे रोजी रात्री 11 घडल्याचे कळाले आहे. कोरोनाग्रस्त पळाल्याची बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. या रुग्णाला वाटेतच पोलिसांनी अडवून विचारपूस केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालय प्रशासनाने पळून गेलेल्या रुग्णाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुंडलिकनगर येथील 32 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याने त्याच्यावर 9 मे पासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 17 मे रोजी रात्री दहा वाजता डॉक्टर त्याची नियमित तपासणी करण्यासाठी गेले असता, तो गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला. डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. रुग्णालयात त्याची शोधाशोध सुरू करण्यात आली. दरम्यान कक्षसेवक क्षितीज शिराळे यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात माहिती दिली. शहरात पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता सोमवारी म्हणजेच 18 मे रोजी पहाटे 3.45 वाजता एमजीएम समोर हा रुग्ण हा वाहतूक पोलिसांना दिसला. त्याला 108 नंबर रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना…
जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका कोरोनाबाधित महिलेने देखील डॉक्टरांची नजर चुकवून रुग्णालयातून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, पोलिसांनी या महिलेला शोधून पुन्हा रुग्णालयात दाखल केले. समतानगर भागातील 65 वर्षीय ही महिला आहे.

क्वारंटाईन नागरिकाने घर सोडले
मुंबई येथून आलेल्या नागरिकांची गोलवाडी नाका इथल्या स्क्रिनिंग सेंटरवर तपासणी केल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील नूर कॉलनी, नारळीबाग येथील क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक अमोल सातोदकर, हवालदार फोलाने, कोतवाल यांनी तपासणी केली असता. ते घरी आढळून आले नाहीत. त्यामुळे गायब असलेल्या नागरिकांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या