‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एका पोलिसासह दहाजण पिंपरीतील महापालिका रुग्णालयात दाखल

644

कोरोनाग्रस्त पुरुष आणि महिलेच्या संपर्कात आलेल्या म्हणजेच ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एका पोलिसासह दहा जणांना पिंपरीतील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी आज ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात येणार आहेत. पिंपरी शहरात गुरुवारी (दि.9) एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये एका 47 वर्षीय पुरुषाचा आणि एका 50 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाल्याचे कळाले होते.

गुरुवारी सापडलेला कोरोनाग्रस्त पुरुष हा हिंजवडी परिसरात कामाला आहे आणि त्याला दोन दिवसांपूर्वी त्रास होत होता. चिंचवड परिसरातील महापालिकेच्या एका दवाखान्यात तो तपासणीसाठी गेला होता. तिथून त्याला वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तो कोणाच्या संपर्कात आला होता याची माहिती प्रशासनाकडून काढली जात आहे. या रुग्णाला दवाखान्यात नेणारे पाच जण आणि त्याच्या जवळील तिघे अशा ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या आठ जणांना महापालिककेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

पुण्यातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेली महिला देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. ही महिला गृहिणी होती. त्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली. महिला कोणाच्या संपर्कात आली होती हे शोधणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. या महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या एका पोलिसासह दोघांना महापालिका रुग्णालयात रात्री उशिरा दाखल केले. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी आज एनआयव्हीकडे पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये पोलिसाचा समावेश असल्याने रिपोर्ट काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरात 10 मार्चपासून आजपर्यंत 24 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बारा रुग्ण बरे झाले आहेत. 12 सक्रिय बाधित रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या