कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवरा रुग्णालयात प्रतीबंधनात्मक उपाययोजना

523

देशभरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्ण व अत्यावश्यक सेवेत सहभागी असणाऱ्या कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक व इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता प्रतिबंधनात्मक उपाययोजना व खबरदारी घेतली जात असल्याची माहिती डॉ राजेंद्र पाटील विखे यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील प्रवरा ग्रामीण रुग्णालय कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाले आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णालयात प्रत्येक गेटवर हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला हात साबणाने स्वच्छ धुवून आत प्रवेश दिला जात आहे. हात धुतल्याशिवाय रुग्णालयात अथवा बाह्य रुग्ण विभागात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांची इन्फ्रा रेड मशीनद्वारे प्राथमिक तपासणी करूनच त्याला प्रवेश दिला जात आहे. तपासणी करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात येत आहे. प्रवरा ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निर्जंतुक केलेल्या मास्कचा पुरवठाही संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. शासन स्तरावरून आदेश आल्यास विलगिकरण कक्ष अथवा कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता प्रवरा ग्रामीण रुग्णालय सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

प्रवरा ग्रामीण रुग्णालयात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण दाखल झालेला नाही. त्यामुळे कुणीही त्याबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज व सहाय्यक कुलसचिव नकुल तांबे यांनी केले आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णालयाकडून सर्वतोपरी प्रतिबंधनात्मक उपाययोजना केल्या असल्याची माहिती डॉ. राजेंद्र पाटील विखे यांनी दिली आहे. शक्य असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुटिंग चेकअप बंद असून केवळ तातडीची सेवा सुरू आहे. पंतप्रधानांच्या सुचनेनुसार शासनाने आदेश दिल्यास आवश्यकता असल्यास 100 बेडची अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी सज्ज आहेत. फक्त तातडीच्या शस्रक्रिया सुरू आहे. पंतप्रधानांच्या आदेशाच सर्वांनी पालन करावे, असे विखे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या