जावेच्या संपर्कात आल्याने महिलेला कोरोनाची लागण, रत्नागिरीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 5 झाली

901

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.रत्नागिरीत आणखी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाच झाली आहे. काही दिवसांपूर्वी साखरतर येथील एका 52 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. कोरोनाग्रस्त महिलेच्या जावेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला 49 वर्षाची आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.रत्नागिरीत आतापर्यंत 5 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे.

खेड येथील 50 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू
कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. 50 वर्षे वयाच्या या व्यक्तीने दुबई प्रवास केल्याचा इतिहास आहे. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते.क्वारंटाईन स्थितीत त्याला त्रास जाणवल्याने सदर रुग्ण खेड येथील डॉ. जावेद महाडिक यांच्या खाजगी रुग्णालयात 02 एप्रिल रोजी दाखल झाला होता. त्याला 6 एप्रिल रोजी कळंबणी येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण ज्या गावात राहत होता त्या गावाला कोरोना विषाणू बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागामार्फत सुरु आहे.

त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल
या रुग्णास कोरोनाची लक्षणे दिसत आहेत व त्याचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे हे माहिती असताना डॉ. जावेद महाडिक याने शासकीय यंत्रणेला कळवले नाही. असं केल्याने त्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकतं हे डॉक्टरला माहिती होतं, तरीही त्याने रुग्णाची माहिती लपवून ठेववल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या