कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रत्नागिरीत पोलीस ठाणे, चौक्यांसह कारागृहात जंतुनाशक फवारणी

408

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कुणीही विनाकारण बाहेर पडू नये,यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून रत्नागिरी आर्मीने पुढाकार घेत रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध पोलीस ठाणे, चौक्या आणि रत्नागिरीतील विशेष कारागृह येथे जंतुनाशक फवारणी केली आहे.

सामाजिक भावनेतून काम करणारे अनेकजण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुढे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या रत्नगिरी आर्मीमध्ये एकत्रित झाले आहेत. रत्नागिरीसाठी काम करणाऱ्या या सैनिकांनी जंतुनाशक फवारणीसाठी पुढाकार घेतला. सर्वसामान्यांसाठी आपला जीव धोक्यत घालत असलेल्या पोलिसांच्या आरोग्याचीही काळजी आम्हाला आहे, हाच संदेश यातून रत्नागिरी आर्मीने दिला आहे. यावेळी महेश गर्दे, डॉ चंद्रशेखर निमकर, सिद्धांत शिंदे, निहार वैद्य, धीरज पाटकर, सचिन शिंदे आणि अन्य रत्नागिरी आर्मीच्या सैनिकांनी यासाठी पुढाकार घेतला. परटवणे, शिरगाव, भाट्ये, लाला कॉम्प्प्लेक्स, जयस्तंभ, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, कुवारबाव, शहर पोलीस स्थानक, वाहतूक शाखा, विशेष कारागृह या ठिकाणी ही जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच पोलीस व्हॅनमधेही फवारणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या