कोरोनाच्या लढ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा उतरला मैदानात, ‘एवढे’ पैसे केले दान

3877

कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखत अनेक कलाकार, उद्योजक आणि खेळाडू लाखो रुपये दान करत आहेत. सचिन, रैना यांच्यानंतर आता मुंबईकर ‘हिटमॅन’ रोहित शर्मा कोरोनाच्या लढ्यासाठी मैदानात उतरला आहे. टीम इंडियाचा एक दिवसीय आणि टी-20 संघाचा उपकर्णधार रोहितने या जीवघेण्या आजारातून सावरण्यासाठी पीएम आणि सीएम सहाय्यता निधीत लाखो रुपये देण्याची घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप जगभरात वाढत आहे. 7 लाख लोकांना याची लागण झाली असून 37 हजार लोकांचा बळी गेला आहे. हिंदुस्थानमध्येही कोरोनाग्रस्त लोकांचा आकडा 1300 पार गेला आहे. या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहाय्यता निधीत मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून रोहित शर्मा याने मंगळवारी ट्विट करत मदतीची घोषणा केली.

देशातील स्थिती पुन्हा पूर्वपदावर येण्याची आवश्यकता आहे आणि याची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. मी पंतप्रधान सहाय्यता निधीत 45 लाख, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (महाराष्ट्र) 25 लाख, फिडिंग इंडियासाठी 5 लाख आणि वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ससाठी 5 लाख रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट रोहित शर्मा याने केले. रोहितने दान केली एकूण रक्कम 80 लाख रुपये आहे.

या खेळाडूंनी केली मदत
याआधी सुरेश रैना याने 52 लाख, सचिन तेंडुलकर याने 50 लाख, पीव्ही सिंधू हिने 10 लाख, अजिंक्य रहाणे याने 10 लाख, सौरव गांगुली याने 50 लाख रुपयांचे तांदूळ, ईशान किशन याने 20 लाख, माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी 5 लाख आणि सौरव तिवारी याने दीड लाख रुपये दान केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या