मुंबईत कोरोनाच्या अफवांचा प्रादुर्भाव; सोशल मीडिया, टीव्ही वाहिन्यांना लागण

1187

कोरोना विषाणू जगभर पसरला आहे. या अदृश्य शत्रूविरुद्ध मानव अथक लढा देतोय. पण कोरोनापेक्षा त्याच्याबद्दल पसरणाऱ्या अफवांनी मात्र लोकं पुरते हैराण झाले आहेत. माणसाला कोरोनाची बाधा होण्यापूर्वी या अफवांची लागण सोशल मीडिया आणि टीव्ही वाहिन्यांना झाली आहे. विषाणूपेक्षाही या अफवांचा वेग अधिक आहे. या अफवांमुळे कोरोनाबद्दलची भीती अधिकच वाढत आहे. कोरोनाशी आपण लढतच आहोत, पण आधी या अफवेबाजांच्या मुसक्या बांधा, त्यांच्या नाकाऐवजी तोंडाला मास्क लावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोना विषाणूची लागण किती जणांना झाली, किती जणांना स्वतंत्र वॉर्डात ठेवण्यात आले आहे, काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती वेळोवेळी संबंधित यंत्रणांकडून नागरिकांना दिली जात आहे. पण त्या अधिकृत यंत्रणांवर अफवेबाज ‘हावी’ झाले आहेत. फेसबुक, व्हॉटस्ऍपसारख्या सोशल मीडियावरून कोरोनाबद्दलची चुकीची माहिती आणि क्लिप्स व्हायरल होत आहेत. त्या क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

टीव्हीवाल्यांमुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी

टीव्ही वाहिन्यांनी तर कहरच केला आहे. त्यांच्यात ‘ब्रेकिंग न्यूज’साठी स्पर्धा लागली आहे. लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केले असताना टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी थेट रेल्वे स्थानकांवर बुम घेऊन घुसत आहेत. तिथे लोकांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने गर्दी जमवत आहेत. समाजामध्ये जनजागृती करण्याऐवजी टीव्ही वाहिन्या या कोरोनाबद्दल भीती अधिकच वाढवत आहेत. आज तर त्यांनी सरकारी कार्यालये सात दिवस बंद ठेवणार, लोकलगाडय़ांच्या वाहतुकीला ब्रेक लावणार अशा बातम्या प्रसारित केल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच घबराट पसरली. अखेर सरकारला असे कोणतेही निर्णय घेतले गेलेले नाहीत असे स्पष्ट करावे लागले.

सिंधुदुर्गात अफवा पसरवणाऱ्या  टीव्ही वाहिन्यांविरुद्ध गुन्हे

सिंधुदुर्ग जिह्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची खोटी बातमी प्रसारित केल्याबद्दल तेथील तीन टीव्ही वाहिन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘ब्रेकिंग मालवणी’, ‘सिंधु रिपोर्टर लाइव्ह’ आणि ‘ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग’ अशा तीन वृत्तवाहिन्यांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.  जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी वृत्तवाहिन्यांवरील अफवांची गंभीर दखल घेतली. संबंधित तीन वृत्तवाहिन्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 54, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1997, आयपीसी कलम 188 आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी या तीन वृत्तवाहिन्यांवर गुन्हे नोंदवले असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाबाबत खोटी माहिती व अफवा पसरवणाऱ्यांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राजकीय पक्षांची कार्यालयेही बंद

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही पक्ष कार्यालये बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नरिमन पॉइंट येथील कार्यालय 22 मार्चपर्यंत फक्त कार्यालयीन कामकाजासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांच्या कार्यालयात राज्याच्या ग्रामीण भागातून दररोज असंख्य कार्यकर्ते वेगवेगळय़ा कामासाठी येतात. पक्षाचे महत्त्वाचे नेते कार्यालयात उपस्थित असले तरी प्रचंड गर्दी उसळते. गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 18 ते 22 मार्च या काळात प्रदेश कार्यालय फक्त कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहील अशी नोटीसच प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या