संभाजीनगरात सारीचे 91 रुग्ण, कोरोनासोबत उभं राहिलंय नवीन संकट

1687
फोटो- प्रातिनिधीक

संभाजीनगरातील कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेचा विषय बनत चालली आहे. यामुळे प्रशासन आणि सामान्य जनता अगोदरच चिंतेत सापडली आहे. त्यातच सारी (सिव्हिअरली ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस) म्हणजेच ‘सारी’चे संकटही अधिक गडद झाले आहे. संभाजीनगर शहरातील सारीच्या रुग्णांची संख्या आता तब्बल 91 वर पोहचली आहे. यातील एकाचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला आहे. सारीच्याही सर्व रुग्णांचे स्वॅब तपासण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.

कोरोना व्हायरसने मार्च महिन्यात शहरात शिरकाव केला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान काही दिवसांपुर्वी सारीचेही काही रुग्ण आढळून आले होते. सारी आणि करोना या दोन्हींची लक्षणे काहीशी सारखीच आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांना सारीच्या रुग्णांचीही माहिती नियमितपणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खासगी आणि शासकीय रुग्णालयांकडून सारीच्या रुग्णांची माहिती महापालिकेकडे येत आहे. सारीमुळे दोन आठवड्यांपुर्वी एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यूही झाला होता. सारीच्या 91 रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे घाटी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर उर्वरित रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयात दाखल आहेत. त्या सर्वांचे स्वॅब तपासण्यात येत आहे.

सारीच्या रुग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे दिसतात
सारी म्हणजे सिव्हिअरली ॲक्युट रेस्पायरेटरी इलनेस. यात रुग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे असा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरुपाचे आहे. त्यामुळे सारीचा रुग्ण हा कोरोनाही असू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रुग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे. सारीच्या एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सारीच्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे, असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या