सांगली जिल्ह्यात हजाराहून अधिक जण होम क्वॉरंटाईनमध्ये

534

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 25 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामुळे तिथल्या प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आणखी कोणाला कोरोनाची लागण झाली आहे का याचा शोध घेण्यास युद्धपातळीवर सुरुवात केली होती. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली त्यांच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात परदेशातून सांगलीत परतलेल्यांची संख्या ही एकूण 1436 इतकी आहे. त्यातील 1048 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

परदेशातून सांगलीत आलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेले असे एकूण 91 जण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सगळ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या सगळ्या रुग्णांच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत यातील 64 जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले असून या सगळ्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 25 जणांचे अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत म्हणजेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या 25 जणांवर मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी एक रुग्ण हा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.

सांगलीचं भूषण असलेली आणि हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनालाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र ताटे यांनी ही माहिती दिली आहे. स्मृती मंधाना फेब्रुवारीमध्ये विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडला गेली होती. कोरोनाची साथ फैलावली त्यावेळी ती मुंबईत होती. संचारबंदी आणि लॉकडाऊन होण्यापूर्वी ती तिच्या सांगलीच्या घरी परतली होती. 25 मार्चपासून तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी रोज तिच्या घरी जाऊन विचारपूस केली जात आहे. 5 एप्रिल रोजी तिच्या होम क्वारंटाईनची मुदत संपणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या