कोरोनाची लस पुढच्या वर्षी येणार, जनजीवन त्याच्या पुढच्या वर्षी पूर्वपदावर येणार

कोरोना व्हायरसचा फैलाव अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये. लस, फेस मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे तीनच उपाय असे आहेत ज्यामुळे कोरोनाला अटकाव करू शकतो. यातील लस अजूनही चाचणी टप्प्यात असून ती बाजारात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे आत्ता सांगता येणं कठीण आहे. ही लस 2021 च्या मध्यापर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही असे सांगण्यात आले आहे. लस जर पुढच्या वर्षी येणार असेल तर जगभरातील विस्कटलेले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी एक वर्ष लागू शकतं. 2022 पर्यंत परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येणार नाही असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.

लसीच्या निरनिराळ्या टप्प्यांबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या पाहून-वाचून सर्वसामान्य लोकांना दिलासा वाटू लागला आहे आणि यातील अनेक जणांना वाटू लागलं आहे की 2020 च्या शेवटी म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारी 2021पर्यंत लस येईल. मात्र सगळ्या लसींच्या प्रगतीची सद्यस्थिती पाहिल्यानंतर अशी परिस्थिती दिसत नसल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. लस बाजारात आल्यानंतर त्याच्या मदतीने कोरोनाचा फैलाव थांबवण्यास मदत होईल हे खरे असले तरी जगभरातील सगळ्या लोकांपर्यंत ही लस पोहोचणे आणि त्यांना ती दिली जाणे याला जवळपास 2 वर्ष लागतील असे डॉ.सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. ही लस आपल्याला टोचली जाईपर्यंत मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुणे, हात सॅनिटायझरने निर्जंतूक करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे यापुढेही करावेच लागेल असे त्या म्हणाल्या.

सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की लस आल्यानंतर आपण निर्धास्त होऊ अशी परिस्थिती नाहीये. 2021 च्या मध्यापर्यंत लस आली तर ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी 2022 उजाडू शकेल असे त्या म्हणाल्या. लस टोचल्यानंतर 60 ते 70 टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणं गरजेचं आहे, त्यामुळे लस आल्यानंतरही निर्धास्त होण्यासारखी परिस्थिती नसेल असे त्यांनी सांगितले. लस विकसित झाल्यानंतर ती आपला या जीवघेण्या आजारापासून किती काळ बचाव करू शकेल, लसीमुळे मिळणारी प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल याची उत्तरे अजून मिळायची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या