क्रीडा जगताला हादरा, कोरोनामुळे आणखी एका खेळाडूचा मृत्यू; 3 आठवड्यात गमावले 7 दिग्गज

1283

जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असून क्रीडा क्षेत्रही यापासून वाचलेले नाही. कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकून आणखी एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी फर्स्ट क्लास खेळाडू जफर सरफराज यांचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यूसमयी ते 50 वर्षाचे होते.

गेल्या आठवड्यात मंगळवारी जफर सरफराज यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. याआधी पाकिस्तानचे माजी स्क्वाश खेळाडू आजम खान यांचाही इंग्लंडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे गेल्या तीन आठवड्यात कोरोनाच्या कचाट्यात आल्याने 7 दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

जफर सरफराज यांनी 15 फर्स्ट क्लास लढतील 616 धावा केल्या होत्या. अष्टपैलू जफर गोलंदाजी आणि फलंदाजीत प्रवीण होते. 1988 ते 1994 या काळात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. यानंतर त्यांनी संन्यास घेतला. जफर यांनी पेशावरच्या सिनियर आणि अंडर-19 संघाचे प्रशिक्षक पदही भूषवले होते. त्यांचा भाऊ अख्तर सरफराज याने 1997-98 मध्ये पाकिस्तानकडून 4 एकदिवसीय लढतीही खेळल्या आहेत.

कोरोनामुळे या दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप
1. इटलीचे प्रसिद्ध धावपटू दोनातो साबिया (56)
2. स्वित्झर्लंडचे आईस हॉकी खेळाडू रोजर शैपो (79)
3. फ्रान्सचा फुटबॉल क्लब रिम्सचे डॉक्टर बर्नार्ड गोंजालेज (60)
4. इंग्लंडच्या लंकाशायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष डेविड हॉजकिस (71)
5. फ्रांसचे ऑलिम्पिक डी मार्शल फुटबॉल क्लबचे माजी अध्यक्ष पेप दिऑफ (68)
6. पाकिस्तानचे माजी स्क्वाश खेळाडू आजम खान (95)
7. पाकिस्तानचे माजी फर्स्ट क्लास खेळाडू जफर सरफराज (50)

आपली प्रतिक्रिया द्या