Corona Virus अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित

3552

कोरोना विषाणूच्या  (Corona Virus) च्या उद्रेकामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी तिथल्या देशवासीयांना उद्देशून केलेल्या निवेदनात या महारोगराईशी (महामारी) मुकाबला करण्यासाठी तिथल्या प्रत्येक राज्याला 50 अब्ज डॉलर्सची मदत पुरवली जाणार आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जात असल्याचंही सांगितलं आहे. ट्रम्प यांच्या सल्लागारांनी आणि तज्ज्ञांनी त्यांना सांगितले आहे की जर कोरोनाला अटकाव करण्याचे वेळीच प्रयत्न झाले नाहीत तर 15 कोटी लोकांना याची लागण होऊ शकते.

ट्रम्प यांनी शनिवारी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की ‘आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावाच लागेल, हाच त्याग आपल्याला भविष्यात फायदेशीर ठरेल.’ पुढचे आठ आठवडे हे अत्यंत कठीण असल्याचंही त्यांनी म्हटलं. अमेरिकेत 1100 जणांना या आजाराची लागण झाली आहे आणि 40 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत आणि विकसित देशासाठीही हा आजार एक चिंतेची बाब बनला आहे. अमेरिकेपूर्वी स्पेनने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये अधिकृतरित्या राष्ट्रीय आणीबाणी लागू करत असल्याची घोषणा केली. या रोगराईच्या संकटाशी लढणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी यावेळी कौतुकही केले. अमेरिकेतील राष्ट्रीय आणीबाणी कायद्यानुसार असा जर आजार किंवा रोगराई पसरली तर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रचंड मोठ्या रकमेची तरतूद करता येते.

दिवसेंदिवस या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शेवटचा आकडा हाती आला तेव्हा जगभरात या आजाराची लागण 1 लाख 35 हजार लोकांना झाली होती. जगभरात 4900 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या