2,500 रुपये द्या व कोरोनाचा ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट मिळवा, खासगी रुग्णालयाचा जीवघेणा खेळ

2370

जीवघेण्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार, कोविड योध्ये जीवाची बाजी लावत आहेत. देशातील रुग्ण संख्या 7 लाखांच्या जवळ पोहोचली असताना आणि मृत्यूचा आकडा 20 हजार पार गेलेला असताना पैशांच्या लोभापायी काही लोक मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये फक्त 2 हजार 500 रुपयात कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागानेही हात जोडले.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरातील एक रुग्णालय फक्त 2 हजार 500 रुपयात नागरिकांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देत असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि कोणत्याही व्यक्तीला फक्त 2 हजार 500 रुपयात कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. आरोग्य विभागाने याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मेरठ येथील एका खासगी रुग्णालयात हा गंभीर प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या रुग्णालयाचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

मेरठच्या आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी रुग्णालयाविरोधात कठोर कारवाई केली असून गुन्हाही दाखल केला आहे. रुग्णालयात नागरिकांना 2 हजार 500 रुपये घेऊन कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट विकला जात होता. याच्या मदतीने लोक अन्य आजारांवर उपचार आणि शस्रक्रिया करू शकत होते. मात्र यामुळे कोरोना पसरण्याचा धोका अधिक होता.

दरम्यान, या प्रकरणी मेरठचे डी.एम. अनिल ढींगरा यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले की, कोरोना रिपोर्ट विकला जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आणि याप्रकरणी गुन्हा दाखल केला. रुग्णालयाचे लायसन्स रद्द करण्यात आले असून रुग्णालय सील करण्यात आले आहे. तसेच असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही आणि या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या