गूड न्यूज…देशात 16 जानेवारीपासून कोरोनावरील लस देण्यास सुरुवात होणार

देशात सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोनावरील लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष लस देण्यास कधी सुरुवात होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. कोरोनावरील लस देण्यास 16 जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याचे केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केले. आरोग्यसेवक आणि फ्रंट लाइन वर्कर( पोलीस, सैन्य दलातील जवान, डॉक्टर) यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी देशात कोरोनाची स्थिती आणि लस देण्यास कधी सुरुवात करायची, याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत 16 जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक आणि फ्रटंलाइन वर्कर यांच्यासह 3 कोटी लोकांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्यांना लस देण्यात येणार आहे. त्यांची संख्या 27 कोटी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधानचे प्रधान सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी देशभरात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी लस वितरणाच्या व्यवस्थेचेही माहिती घेतली. या बैठकीनंतर 16 जानेवारीपासून कोरोनाची लस देण्यात सुरुवात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईचा महत्त्वाचा टप्पा 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

लस देण्याच्या प्रत्येक केंद्रावर एका सत्रात 100 ते 200 जणांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर अर्धा तास त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर लसीचा काय परिणाम होतो, याची तपासणी करण्यात येणार आहे. प्राधान्यक्रमानुसार लस देण्यासाठी नोंदणी झालेल्यांनाच लस देण्यात येणार आहे. केंद्रावर लस देण्यासाठी नोंदणी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोरोनाची लस देण्यासाठी देशभरात तीन टप्प्यात रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली आहे.

16 जानेवारीपासून लस देण्यात सुरुवात होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. कोरोनाविरोधातील लढाईत 16 जानेवारीला हिंदुस्थान महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. या अभियानात डॉक्टर, आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद कजेरीवाल यांनी कोरोना लस सर्वांना मोफत देण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या