कोरोनावर खरंच 15 ऑगस्टपर्यंत लस येणार? या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणतंय…

1587

देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असताना काही दिवसांपूर्वी एक दावा करण्यात आला होता. यात 7 जुलैला कोरोना लसीची चाचणी सुरू होईल आणि 15 ऑगस्टपर्यंत लस लाँच केली जाईल असे म्हटले होते. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रश्न विचारण्यात आला असता आरोग्य मंत्रालयाने अजून चाचणी सुरू झाली नसल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या ठिकाणी ही चाचणी होणार आहे त्या ठिकाणांची निवड करण्यात आली असून लवकरच चाचणी सुरू होईल असे म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या जगभरात 100 हुन अधिक लसीची चाचणी घेण्यात येत असून त्या वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू आहेत. हिंदुस्थानमध्येही कोरोनाच्या दोन लसीची चाचणी घेण्यात येणार असून या पूर्णतः स्वदेशी आहेत. यातील एक भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडची आणि दुसरी मेसर्स कॅडिला हेल्थकेयरची आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आयसीएमआर सोबत मिळून कोरोना लसीवर काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सामुदायिक संसर्ग नाही
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्ण आढळण्याचे आणि मृत्यूचे प्रमाणही दिवसेदिवस वाढत आहे. या परिस्थितीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासा दिला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी देशात कोरोनाचा सामुहिक संसर्ग झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्येबाबत आपण जगभरात तिसऱ्या स्थानावर असलो तरी लोकसंख्येचा विचार करता आपण कोरोना फैलावावर चांगल्याप्रकारे नियंत्रण ठेवले आहे. 10 लाखांमध्ये 538 कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे डॉ हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले

आपली प्रतिक्रिया द्या