Corona Virus विरोधी लस तयार केल्याचा चीनचा दावा, चाचणीला सुरुवात

1751

कोरोना व्हायरसपासून सुटका मिळावी यासाठी जगभरातील तज्ज्ञमंडळी उपाय शोधत आहेत. ज्या चीनपासून या आजाराच्या फैलावाला सुरुवात झाली त्याच चीनमध्ये कोरोनाविरोधी लस तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. ‘टर्मिनेटर ऑफ इबोला’ असं या लसीला नाव देण्यात आलं आहे. या लसीची मानवावर चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे. जैव युद्ध (Biological War) तज्ज्ञांनी ही लस तयार केल्याचं सांगण्यात येत आहे. ही लस तयार होत असतानाच चीनमधल्या जाणकारांनी भीती वर्तवली आहे की या आजाराचा दुसरा उद्रेक लवकरच सुरू होऊ शकतो.

चीनमधल्या शास्त्रज्ञ चेन वुई यांनी मंगळवारी घोषणा केली की त्यांना तिथल्या सरकारने लसीची चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे. कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी ही लस एक मोठं साधन असून जर ही लस चीनमधल्या रुग्णांना बरं करण्यात सफल ठरली तर ही बाब चीनची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावणारी ठरेल तसेच विज्ञान क्षेत्रातील चीनने किती प्रगती केली आहे हे दर्शवणारे ठरेल असे वुई यांनी सांगितले.

या लसीचं व्यापक प्रमाणावर उत्पादन व्हावं यासाठी चीनने तयारी सुरू केलं असल्याचं वुई यांनी सांगितले. एक महिन्याच्या अथक संशोधनानंतर ही लस तयार करण्यात आल्याचंही ते म्हणाले. ही लस तयार केली जात असताना इबोलाच्या लसीचाही अभ्यास करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 2003 साली सार्स हा आजार फैलावला होता. कोरोनावर लस तयार करणाऱ्या वुई यांनी सार्सचा मुकाबला करण्यासाठी एक स्प्रे तयार केला होता ज्यामुळे 14 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा जीव बजावला होता.

टर्मिनेटर ऑफ इबोला ही लस तयार करणारे वुई हे लस संशोधन क्षेत्रातील जनुकीय अभियंता आहेत. चीनमध्ये जीवघेण्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी ज्या लसी तयार करण्यात त्या बनवणाऱ्या चमूचं नेतृत्व वुई करतात. वुई हे लष्करी अधिकारी असून ते मेजर जनरल पदावर कार्यरत आहेत. 26 जानेवारीपासून वुई यांनी या लसीवर काम करायला सुरुवात केल्याचं कळतंय.

आपली प्रतिक्रिया द्या