खुशखबर! कोरोना लसीची मानवावरील पहिली चाचणी यशस्वी, जगाच्या आशा पल्लवित

6975

कोरोना विषाणूचे थैमान जगभरात सुरू आहे. आजपर्यंत 46 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून 3 लाख 8 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण जग एक झाले असून व्हायरसवर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी जगभरातील  प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक दिवस-रात्र एक करत आहेत. अशातच अमेरिकेतील औषध बनवणाऱ्या मॉडर्ना नावाच्या कंपनीने लसीची मानवावरील पहिली चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केल्याने जगाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मॉडर्ना कंपनीने कोरोना विषाणूवर लस बनवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पार केल्याचे जाहीर केले आहे. लसीची मानवी चाचणी सुरु केली असून त्याचे उत्तम परिणाम मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. मानवावर केलेल्या वैद्यकीय चाचणीचे सुरुवातीचे निकाल सकारात्मक आले असून आता जुलै महिन्यात लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा सुरु होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तिसरा टप्पाही यशस्वी ठरला तर कंपनी लसीच्या पेटंटसाठी अर्ज करेल. कंपनीच्या दाव्यानुसार लस बनवण्यात यश आल्यास जगासाठी ही मोठी देणगी असणार आहे.

दरम्यान, या लसीचे नाव ‘mRNA-1273’ असून कंपनीचा दावा आहे की mRNA-1273 च्या क्लिनिकल ट्रायलमध्ये अनेक लोकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. ज्यात 8 रुग्णांच्या शरीरात चाचणीदरम्यान कोरोनाला रोखणारी अँटीबॉडी बनली. ज्याचे प्रमाण हे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीएवढंच किंवा त्यापेक्षा जास्त होता. ही अँटीबॉडी किंवा इम्यून रिस्पॉन्स कोरोनाला रोखू शकते हे आम्ही सिद्ध केले आहे, असेही मॉडर्ना कंपनीचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. ताल जक्स यांनी सांगितले.

तर पेटंटसाठी अर्ज
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बँसेल म्हणाले की, ‘पहिल्या टप्प्यातील चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. जुलैमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करू. आम्ही लवकरात लवकर ही लस तयार करू इच्छितो आणि नंतर पेटंटसाठी अर्ज करू.’

आपली प्रतिक्रिया द्या