कोरोनावरील लस खुल्या बाजारात विकण्यास परवानगी द्या!ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण हिंदुस्थानात चिंतेची परिस्थिती निर्माण केली आहे. ही लाट ओसरावी आणि यापुढे येणाऱ्या कोरोनाच्या लाटांना तोंड देता यावे यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोनावरील लस खुल्या बाजारात विकण्यास परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. पटानायक यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी 4 मागण्या केल्या आहेत. या 4 मागण्यांपैकी लसीच्या खुल्या बाजारातील विक्रीला परवानगी देण्याची ही प्रमुख मागणी आहे.

पटनायक यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की ‘सरकारी पुरवठा साखळीबाहेर, खुल्या बाजारात कोरोनावरील लस विकता यावी यासाठी परवानगी द्यावी. ज्या नागरिकांना लस विकत घेणं शक्य आहे त्यांना याचा फायदा होईल आणि सरकार अत्यंत गरजू लोकांना लस देण्यावर लक्ष केंद्रीत करू शकेल.’ पटनायक यांनी याच पत्रात आणखी एक मागणी केली आहे. ज्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या शहरात प्राधान्याने लसीकरण केलं जावं असं पटनायक यांनी म्हटलं आहे. या शहरांमध्ये लसीकरणासाठी आवश्यक वयोमर्यादेच्या नियमामध्येही सवलत देण्यात यावी असं त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वेगाने पसरत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी राजकीय नेत्यांपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, कॉँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाल, शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांच्यासह अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

बेळगावमध्ये निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना येडियुरप्पा यांची तब्येत अचानक बिघडली. सौम्य ताप येत असल्याने कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला. त्यांच्यापाठोपाठ त्यांची पत्नी हरसिमरत कौर बादल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व नेत्यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्यांदा कोरोना

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेय. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठ महिन्यांत दुसऱ्यांदा येडियुरप्पांना कोरोनाची लागण झालीय. यापूर्वी येडियुरप्पा यांना 2 ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती.

पश्चिम बंगालमध्ये एका उमेदवाराचा मृत्यू, तर पाच उमेदवारांना संसर्ग

पश्चिम बंगालच्या समशेरगंज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रजाउल हक यांचे कोरोनामुळे गुरुवारी निधन झाले. त्यापाठोपाठ निवडणुकीत उभे असलेले पाच उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. तृणमूल कॉँग्रेसचे मोहम्मद गुलाम रब्बानी, कल्पना किस्कू, डॉ. प्रदीपकुमार बर्मा, भाजपचे आनंदमय बर्मन, आरएसपीचे प्रदीपकुमार नंदी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या